

महिला रेल्वे अधिकाऱ्याच्या घरातून मोलकरणीने दागिने व रोकड लांबवली
लाईव्ह सीसीटीव्ही पाहून लॉकर उघडताना रंगेहात पकडले
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रेल्वे विभागातील महिला अधिकाऱ्याच्या घरातून घरकाम करणाऱ्या महिलेनेच लाखोंचे दागिने आणि रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. संबंधित महिला अधिकारी आणि त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलेने डाव साधत ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नीलिमा मनोज ठाकरे असे या रेल्वे महिला अधिकाऱ्याचे नाव असून त्या इंडोजर्मन टूल रूम क्वार्टर्समध्ये राहतात. मागील १० महिन्यांपासून सुनीता पडुळे (वय अंदाजे ४५, रा. मिसारवाडी) ही महिला त्यांच्या घरी साफसफाईचे काम करत होती. ऑक्टोबर महिन्यात दसऱ्यापूर्वी घरातील सोन्याचे दागिने हळूहळू गायब होण्यास सुरुवात झाली. घरात इतर कोणाचाही वावर नसताना वारंवार दागिने चोरीला जात असल्याने नीलिमा यांना घरकाम करणाऱ्या सुनीतावर संशय आला. मात्र, ठोस पुरावा नसल्याने त्यांनी थेट आरोप न करता घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्याचे लाइव्ह फुटेज मोबाईलवर पाहण्याची सोय केली.
२४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीच्या सुट्टी दिवशी नीलिमा यांनी घराबाहेर जात असल्याचा बहाणा केला आणि त्या बाहेर थांबून मोबाईलवर सीसीटीव्हीचे लाइव्ह फुटेज पाहू लागल्या. यावेळी सुनीताने देवघरातील ड्रॉवरमधून कपाटाची चावी काढून कपाटातील सोन्याचे लॉकर उघडल्याचे स्पष्ट दिसले. हा प्रकार मोबाईलवर पाहताच त्यांनी तातडीने घरात जाऊन सुनीताला रंगेहात पकडले. मात्र, ती उडवाउडवीची उत्तरे देऊन तिथून निघून गेली.
तपासणी केली असता या प्रकरणात तब्बल १०.७ तोळे सोन्याचे दागिने, ३२ भार चांदीचे दागिने आणि ५५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. नीलिमा ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून २४ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात सुनीता पडुळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीची ही घटना कोठे घडली?
ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील इंडोजर्मन टूल रूम क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या महिला रेल्वे अधिकारी नीलिमा मनोज ठाकरे यांच्या घरी घडली.
या चोरीचा उलगडा कसा झाला?
वारंवार दागिने गायब होत असल्याने नीलिमा यांनी घरात सीसीटीव्ही बसवले होते; २४ नोव्हेंबर रोजी बाहेर जाण्याचा बहाणा करून त्यांनी मोबाईलवर लाईव्ह फुटेज पाहिले असता सुनीता पडुळे हिने कपाटाची चावी घेऊन लॉकर उघडल्याचे स्पष्ट दिसले.
या प्रकरणात काय ऐवज चोरीला गेला आणि गुन्हा कोठे दाखल झाला?
१०.७ तोळे सोन्याचे दागिने, ३२ भार चांदीचे दागिने आणि ५५ हजार रुपये रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले असून, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात सुनीता पडुळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.