

थार चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालून ५० फूट फरफटत नेले
ई-चलनसाठी फोटो काढताच चालकाने गाडी अंगावर घातल्याने जखमी
बारामती शहर पोलिसांनी तपासात धीरज शेडगे गाडी चालवत असल्याचे निष्पन्न करत त्याचा शोध सुरू.
पुणे: काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेली एक महिंद्रा थार रस्त्यावर रूबाबात धावताना दिसली. हे पाहून वाहतूक पोलिसांनी वाहनाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने धक्कादायक कृत्य करत क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या. महिंद्रा थार जीपचालकाने कारवाईसाठी थांबवणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या थेट अंगावर वाहन घातलं. यानंतर त्यांना बोनेटवरून सुमारे ५० फूट फरफटत नेल्याची अत्यंत धक्कादायक घटना बारामतीतील सम्यक चौकात घडली आहे. या घटनेत वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रेय भोसले जखमी झाले आहेत, तर चालक वाहनासह पसार झाला आहे.
बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास दत्तात्रेय भोसले सम्यक चौकात कर्तव्य बजावत होते. यावेळी तिथे एक थार आली. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या महिंद्रा थारला (MH 53 A 4400) त्यांनी थांबण्याचा इशारा केला. भोसले ई-चलन मशीनद्वारे वाहनाचा फोटो काढत असताना चालकाने अचानक वेग वाढवून जीप थेट त्यांच्या अंगावर घातली. धडकेत ते बोनेटवर फेकले गेले. मात्र हे पाहूनही न थांबता चालकाने त्यांना ४० ते ५० फूट फरफटत नेलं. काही अंतरावर तोल जाऊन भोसले रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली.
या घटनेनंतर चालक थारसह घटनास्थळावरून पसार झाला. जखमी दत्तात्रेय भोसले यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी तपास सुरू केला. वाहनमालकाशी संपर्क साधल्यानंतर घटनेवेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी धीरज शेडगेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बारामतीत वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याची घटना कोठे घडली?
ही घटना बारामतीतील सम्यक चौकात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
या घटनेत कोणता पोलीस कर्मचारी जखमी झाला?
वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रेय भोसले हे या घटनेत जखमी झाले असून, त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात कोणाचा शोध सुरू केला आहे?
वाहनमालकाच्या संपर्कातून घटनेवेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे थार चालवत असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून त्याचा शोध सुरू केला आहे.