सौजन्य फोटो - सोशल मिडीया
छत्रपती संभाजीनगर : शहरातील हडको परिसरातील एन-१३ वानखेडेनगर येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजना नीलेश शेजवळ (२३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर पतीने आपली फसवणूक केल्याचे समोर आले आणि सासरीही मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. संजना ही जालना येथील रावसाहेब मगरे यांची धाकटी मुलगी होती. तिने कॉम्प्युटर डिप्लोमा पूर्ण केला होता. ४ जून २०२६ रोजी तिचे नीलेश शेजवळ याच्यासोबत लग्न झाले होते. लग्न जुळवताना नीलेशने आपण शासकीय अधिकारी असल्याचे सांगितल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीचे भविष्य सुरक्षित राहील, या विश्वासाने कुटुंबीयांनी थाटामाटात तिचे लग्न लावून दिले.
लग्नानंतर काही दिवसांतच नीलेश हा शासकीय अधिकारी नसून परदेशात विद्यार्थ्यांना पाठविणाऱ्या एका कन्सल्टन्सीमध्ये काम करत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले, असा आरोप आहे. लग्न करताना आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतरही संजनाने संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासरी स्वयंपाक आणि राहणीमानावरून तिला वारंवार टोमणे मारले जात होते, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकारामुळे ती मानसिक तणावात होती, असेही नातेवाईकांनी सांगितले.
घटनेच्या आदल्या रात्री संजनाने आईला फोन करून सासरी होत असलेल्या त्रासाबाबत रडत माहिती दिली होती. आईशी फोनवर बोलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर संजनाच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींनी घटनेची माहिती देण्यास उशीर केला तसेच रुग्णालयातून थेट निघून गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. संजनाच्या आत्महत्येमागे नेमकी कोणती कारणे होती, तसेच माहेरच्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.






