पुणे हादरलं! न्यायालयाबाहेर बंदूक फेकून हल्लेखोर पसार; मंदार किवळेवरील हल्ल्यामागे कात्रजमधील हत्येची इनसाईड स्टोरी!

चार दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला अन् थेट शिवाजीनगर कोर्टाच्या दारातच रक्तरंजित खेळ! कात्रजमधील शुभम चव्हाण हत्याकांडातील आरोपी मंदार किवळेवरील हल्ल्यामागे 'त्या' खुनाचा बदला? सीसीटीव्ही फुटेज समोर...
Pune Court Attack
सौजन्य फोटो - सोशल मिडीया Pune Court Attack
Published on: 
Updated on: 
  • शिवाजीनगर कोर्ट बाहेर मंदार किवळेवर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला

  • कात्रजमधील शुभम चव्हाण हत्येचा बदला घेण्यासाठी जामिनावर सुटलेल्या आरोपीवर हल्ला

  • बंदूक टाकून पळालेल्या आरोपींचा पुणे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर आज (दि. २५ नोव्हेंबर २०२६) भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यामागे कात्रजमधील जुन्या हत्याकांडाचे खळबळजनक कनेक्शन समोर आले आहे. या हल्ल्यात लक्ष्य झालेला मंदार मारुती किवळे हा कात्रज येथील संतोषनगर परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे, तो अवघ्या चार दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.

नेमकं कनेक्शन काय?

पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे २० एप्रिल २०२५ रोजी जमिनीच्या आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाचा निर्घृण खून झाला होता. या गुन्ह्यात मंदार मारुती किवळे हा मुख्य आरोपी म्हणून तुरुंगात होता. चार दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर सुटलेला मंदार किवळे आज न्यायालयीन कामकाजासाठी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात आला होता. जुन्या हत्येचा बदला घेण्याच्या हेतूनेच त्याच्यावर हा कट रचून हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नेम चुकताच उपसले कोयते; बंदूक घटनास्थळीच टाकून पळ

गेल्या काही दिवसांपासून पुणे कोर्टाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत असतानाच, आज थेट कोर्टाच्या गेट क्रमांक ४ बाहेर कोणीही विचार केला नसेल असा थरार घडला. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मंदार किवळेवर आधी गोळीबार केला, मात्र त्यांचा नेम चुकला. त्यानंतर हल्लेखोरांनी थेट कोयते उपसून मंदारवर सपासप वार केले. गजबजलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात काही उपस्थित नागरिकही जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपी बंदूक घटनास्थळीच फेकून देत पसार झाले.

१०० आणि १०८ नंबर न लागल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा; सीसीटीव्ही फुटेज समोर

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेची पथके आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. दरम्यान, घटनेनंतर तात्काळ १०० आणि १०८ क्रमांकावर फोन केले असता एकही फोन लागला नसल्याचा गंभीर दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याआधारे फरार हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. भरदिवसा न्यायालयाच्या दारात घडलेल्या या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला जात आहे.

Q

शिवाजीनगर न्यायालयाबाहेर ज्या व्यक्तीवर हल्ला झाला तिचे नाव काय आणि तिची पार्श्वभूमी काय आहे?

A

हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव मंदार मारुती किवळे असून तो कात्रजमधील संतोषनगर येथे २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

Q

मंदार किवळे शिवाजीनगर न्यायालयात का आला होता?

A

मंदार किवळे चार दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता आणि आज (२५ नोव्हेंबर २०२६) न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात आला होता.

Q

या हल्ल्यामागे कोणते कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे?

A

कात्रजमधील जमिनीच्या आर्थिक वादातून झालेल्या शुभम चव्हाण हत्येचा जुना बदला घेण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पुणे पोलिसांना आहे.