संग्रहित फोटो
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अटक केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.
युनूस गफार खान (वय ५५, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध ११ वर्षीय शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी पीडित मुलगी शाळेतून घरी जात होती. यावेळी नराधम रिक्षाचालक खान याने तिला गाठून तिच्याशी अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने धाडसाने घरी माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल होताच आरोपी खान पसार झाला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.
तपासाचा ‘वेग’ ठरला चर्चेचा विषय
सर्वसाधारणपणे अशा गुन्ह्यांत पुरावे गोळा करण्यास वेळ लागतो, मात्र हडपसर पोलिसांनी या प्रकरणात कमालीची तत्परता दाखवली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तातडीने प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि आवश्यक तांत्रिक पुरावे संकलित केले. गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ २४ तासांच्या आत न्यायालयात भक्कम आरोपपत्र सादर करण्यात आले, जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी.प रिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक विनोद साने, दत्तात्रय खेडेकर आणि कानेकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हे सुद्धा वाचा : नाट्यगृहांच्या ऑनलाईन आरक्षणाला विरोध; नाट्य व्यवस्थापक संघाचे महापौरांना निवेदन






