कैलास कॉलनी फायरिंग तपासात 'खाकी कनेक्शन'; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित
उल्हासनगर कैलास कॉलनीतील फायरिंग प्रकरणात दोन जणांचा मृत्यू आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या तपासातून आरोपी आणि पोलिसातील कथित कनेक्शन उघड झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हिललाईन पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी दीपक ठाकुरच्या परिसरातील ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर जप्त करून व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगची पाहणी केली. त्यामध्ये तत्कालीन हिललाईन आणि सध्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुभाष वामन घाडगे हे मध्यरात्री दीपक ठाकुरच्या ‘के. सी. ग्रुप’ कार्यालयात जाऊन आरोपी दीपक ठाकुर, सुभाष कोळी आणि त्यांच्या साथीदारांना भेटत असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच सुभाष घाडगे यांनी दाखल गुन्हे, अटक आरोपींची चौकशी, आरोपीना चौकशी दरम्यान होणारी मारहाण तसेच मध्यवर्ती, हिललाईन आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांच्या कामकाजासह गोपनीय व वैयक्तिक माहिती आरोपींना पुरवल्याचा गंभीर ठपकाही ठेवण्यात आला आहे. या माहितीचा वापर पोलिसांविरोधात स्थानिक युट्युब चॅनलवर बातम्या प्रसारित करून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी होत असल्याचे आदेशात नमूद आहे.
पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची कारवाई
या गैरवर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत उल्हासनगर परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सुभाष घाडगे यांना सेवेतून निलंबित केले आहे.






