
पोलिस अपहरणकर्त्यांकडून जप्त केलेली शस्त्रास्त्र दाखविताना
अंबरनाथ : एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० वर्षीय तरुणाचं अपहरण करून व्हिडिओ कॉल द्वारे त्याच्या वडिलांकडे ४० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच खंडणी न पुरवल्यास मुलाला जीवेत ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सूत्र हलवली आणि शिताफीने १० खंडणीखोर आरोपींना अटक केली.
घटनाक्रम
मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान बांधकाम व्यवसायिकाचा मुलगा स्विफ्ट कारने बांधकाम सुरू असलेल्या साइटवर जात होता. या दरम्यान एका एर्टिगा गाडीने त्याचा पाठलाग सुरू केला, हे वाहन चामर्स ग्लोबल सिटी अंबरनाथ पूर्व परिसरात येताच बुरखाधारी अपहरणकर्त्यांनी स्विफ्ट कार मधील बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाला खाली उतरवून आपल्या एर्टिगा वाहनात जबरदस्तीने बसवले. अपहरण झालेल्या मुलाच्या मोबाईल वरून त्याच्या वडिलांना अपरणकर्त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे ४० कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच खंडणी न दिल्यास मुलाला जीवेठार मारण्यात येईल अशी धमकी मुलाच्या वडिलांना आली. घाबरलेल्या बांधकाम व्यवसायकाने आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांना कळवली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ विविध तपास पथके तयार करून शोध सुरू केला.
अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर पोलिस विभागाचे १५ पोलीस अधिकारी आणि ८० पोलीस अमलदारांची ८ पथके तयार करून अपहरण झालेल्या मुलाचा आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्र वेगाने फिरवून वेगवेगळ्या परिसरात नाकाबंदी आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू झाला. सुरुवातीला आरोपींचे लोकेशन – बारवी डॅम परिसरात दिसून आले, त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी नाकाबंदी करून संपूर्ण परिसरातील हॉटेल्स, धाबे अशा ठिकाणी शोध मोहीम सुरू केली.
यावेळी अपहरणकर्त्यांकडून मुलाच्या वडिलांकडे ४० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. नंतर ७ कोटी रुपये आणि त्यानंतर २ कोटी रुपयांवर एकमत होऊन पैशांची व्यवस्था करण्यास सांगितण्यात आले. यावेळी पोलीस पथक देखील फिर्यादींसोबतच होते. रक्कम स्वीकारण्यासाठी दोन बॅग मध्ये पैसे भरून ओला कार बुक करा आणि त्या ड्रायव्हरचा नंबर आम्हाला पाठवा असे या अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना सांगितलं, आणि ही कार कुठे पाठवायची हे आम्ही तुम्हाला नंतर कळवू अशी माहिती मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी दिली.
आरोपींच्या सांगण्याप्रमाणे पैशांची व्यवस्था करून एका ओला कारच्या माध्यमातून हे पैसे अपहरण करताना देण्यासाठी कार रवाना करण्यात आली. दिवसभर अपहरणकर्त्यांनी ओला चालकाशी मोबाईल वर संपर्क करून कार वेगवेगळ्या परिसरात फिरवली. मात्र सर्वच ठिकाणी नाकाबंदी आणि पोलिसांच्या हालचाली पाहून पोलीस पाठलाग करत असल्याचं आरोपींच्या लक्षात आले. आणि त्यांनी खंडणी घेण्यास नकार देत तुमचा मोबाईल मुलगा पंधरा ते वीस मिनिटात सुखरूप घरी पोहोचेल असे सांगितले आणि ती कार पुन्हा बोलवून त्यातील पैसा परत घेण्यास सांगितले.
मात्र पोलिसांनी आपला तांत्रिक तपास यावेळी सुरूच ठेवला. आरोपींच्या वेगवेगळ्या मोबाईलचे लोकेशन हे सुरुवातीला पिसेडॅम , वासेरेगाव, पडघा, भिवंडी, अशा ठिकाणी दिसून येत होते.पोलिसांनी गुप्तता बाळगून या परिसरात शोध घेतला असता एका डॅम परिसरात अपहरण झालेला मुलगा पोलिसांना सुखरूप मिळून आला.
यानंतरही पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू ठेऊन आरोपींच्या सिमकार्ड वरुन मुख्य आरोपीचा शोध लावला आणि त्याला अटक केली. यावेळी पोलिसांनी १० आरोपी अटक केले असून यातील मुख्य आरोपी हा मुंबई महानगरपालिकेचा निलंबित कर्मचारी असल्याची माहिती समोर आली. यातील मुख्य आरोपी देविदास वाघमारे आणि दत्तात्रय पवार हे फायरमन असून त्यांनी काही तरुणांना अग्निशमन दलात नोकरी मिळवून देण्याच आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल असून ते जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणातील फिर्यादींना पैसे परत देण्यासाठी आरोपींनी हा अपहरणाचा करून पैसे मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचं पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले.
पोलिसांनी जप्त केली शस्त्रास्त्र
आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कार, गावठी बनावटीचे पिस्टल व तीन काडतुसे, एअर पिस्टल, लोखंडी धारदार सुरा, नायलॉन दोरी,काळ्या रंगाचे मास्क, ५ मोबाईल असा एकूण जवळपास साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींना न्यायालयाने हजर केले असता ३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, अशोक भगत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.