

कोथळी परिसरात हरिपूरचे व्यावसायिकाचा गळा चिरून खून
गाडी आडवी मारल्याच्या रागातून गाडी अडवून मानेवर वार
जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना घेतले ताब्यात
चारचाकी गाडी आडवी मारल्याच्या किरकोळ रागातून कोल्हापूर-सांगली सीमेवर एका व्यावसायिकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरोळ तालुक्यातील कोथळी परिसरात हा रक्तरंजित थरार घडला असून, मिरज तालुक्यातील हरिपूरच्या माजी सरपंचाचे पती विकास बाबूराव बोंद्रे (वय ४५) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मृत विकास बोंद्रे हे हरिपूरचे ज्येष्ठ नेते संगुदादा बोंद्रे यांचे नातू होते आणि त्यांचा वीटभट्टी व प्लॉट विकासकाचा व्यवसाय होता. जयसिंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हे मित्र महंमद नायकवडी यांच्यासोबत मोटारीतून कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. काम आटोपून सायंकाळच्या सुमारास ते हरिपूरकडे परतत होते. कोथळी परिसरात आले असताना संशयित अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (वय ३६, रा. कोथळी) याची गाडी देखील त्याच मार्गावर होती. विकास बोंद्रे यांच्या चारचाकीमुळे संशयिताच्या गाडीला अडथळा निर्माण झाल्याचा त्याला राग आला. या संतापातून अभी पाटील याने बोंद्रे यांच्या गाडीचा पाठलाग करून रिंग रोड परिसरात गाडी अडवली. यावेळी दोघांत जोरदार वादावादी झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर संशयिताने बोंद्रे यांच्या गाडीची काच फोडली आणि जवळच्या धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर वार करत गळा चिरून घटनास्थळावरून पळ काढला.
गंभीर जखमी अवस्थेतील विकास बोंद्रे यांना त्यांचे मित्र महंमद नायकवडी यांनी कुटुंबीयांना माहिती देत तातडीने सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत विकास बोंद्रे यांची राजकीय पार्श्वभूमी असून त्यांच्या पत्नी कविता बोंद्रे या हरिपूरच्या माजी सरपंच होत्या, तर त्यांचे आजोबा देखील हरिपूरचे सरपंच होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून या घटनेने बोंद्रे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, कोल्हापूर-सांगली सीमा भागातील गावांत अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नशेखोरीतून अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये देखील वाढ होत असल्याचा आरोप होत असून, दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोल्हापूर-सांगली सीमेवर कोणत्या व्यावसायिकाची हत्या झाली आहे?
मिरज तालुक्यातील हरिपूर येथील वीटभट्टी व प्लॉट व्यावसायिक आणि माजी सरपंच कविता बोंद्रे यांचे पती विकास बाबूराव बोंद्रे (वय ४५) यांची निर्घृण हत्या झाली आहे.
विकास बोंद्रे यांची हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली?
कोल्हापुरातून परतताना चारचाकी गाडी आडवी मारल्याचा (गाडीला अडथळा निर्माण झाल्याचा) राग आल्याने संशयिताने पाठलाग करत गाडी अडवली, काच फोडली आणि धारदार हत्याराने गळा चिरून त्यांचा खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?
जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.