

बोरे चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
वडनेर खाकुर्डी पोलिसांनी संशयित वसंत हिरेला ताब्यात घेऊन केला गुन्हा दाखल
पीडित मुलीचा शोध सुरू; जबाबानंतर कठोर कारवाई होणार
मालेगाव: शेतातील बोरे चोरल्याच्या संशयावरून एका अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण केली. मालेगाव-नामपूर महामार्गालगत असलेल्या काष्टी शिवारातून हा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. या घटनेचा व्हिडिओ शनिवारी (दि. २८) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यासह मालेगाव परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. घटनेची गंभीर दखल घेत वडनेर खाकुर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आहे, तर पीडित मुलीचा शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मालेगाव-नामपूर रस्त्यालगत काष्टी शिवारात एका शेतातील बोरे चोरल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात येत असल्याचे दृश्य या व्हायरल चित्रफितीत कैद झाले आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ प्रसारित होताच विविध स्तरांतून संताप व्यक्त होऊ लागला. या प्रकाराची माहिती वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाईची सूत्रे हलवली.
पोलिस पथकाने तात्काळ तपास सुरू करत मारहाण करणाऱ्या वसंत दगा हिरे या संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी आणि चौकशीसाठी त्याला अपर पोलिस अधीक्षक गुंजाळ यांच्यासमोर हजर करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणी पोलिस हवालदार प्रशांत नामदेव सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात संशयित वसंत हिरे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील मारहाण झालेली पीडित अल्पवयीन मुलगी कोण आहे, याची ओळख पटवून तिचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पीडित मुलीचा शोध लागल्यानंतर तिचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला जाईल आणि त्या जबाबाच्या व तपासाच्या आधारे संशयिताविरोधात कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मालेगाव परिसरात नेमकी कोणती संतापजनक घटना घडली आहे?
मालेगाव-नामपूर महामार्गालगत काष्टी शिवारात शेतातील बोरे चोरल्याच्या संशयावरून एका अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण करण्यात आली, ज्याचा व्हिडिओ शनिवारी (दि. २८) सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या प्रकरणी पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले आहे?
वडनेर खाकुर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य संशयित वसंत दगा हिरे याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीबाबत सध्या काय तपास सुरू आहे?
मारहाण झालेल्या पीडित मुलीची ओळख पटवून तिचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून, तिचा जबाब नोंदवल्यानंतर संशयितावर कठोर कारवाई केली जाईल.