सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मेरठ : देशभर चर्चेत आलेल्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडात मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना न्यायालयाने हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. दोघांनी मिळून सौरभची हत्या केल्याचे न्यायालयाने मान्य केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये लपवण्यात आले होते. दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही दोषी अस्वस्थ आणि तणावाखाली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.
कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान गेल्या तीन-चार दिवसांपासून तिच्या सुमारे सात वर्षांच्या मोठ्या मुलीला भेटण्याची विनंती करत आहे. मात्र, अद्याप मुलीला तिची भेट घडवून आणण्यात आलेली नाही. मुस्कान गेल्या तीन दिवसांपासून कारागृहात पूजा करत होती. दोघांच्याही वर्तनात बदल दिसून आला आहे. रात्री आणि सकाळचे जेवण त्यांनी कमी केले असून, त्यांना नीट झोपही लागत नसल्याचे सांगण्यात आले. साहिलने सहकैद्यांशी बोलणेही बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होता. तो २४ फेब्रुवारी २०२५ रोजी लंडनहून मेरठला परतला होता. ३ मार्च २०२५ रोजी मुस्कानने साहिलच्या मदतीने सौरभच्या जेवणात औषध मिसळून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर बेडरूममध्ये झोपलेल्या सौरभच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवण्यात आले. त्यावर सिमेंटचे मिश्रण टाकून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी मुस्कान शिमला-मनालीला गेल्याचे तपासात समोर आले होते.
संवेदनशील प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही दोषींना जिल्हा न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना फॉरेन्सिक अहवालासह विविध मुद्द्यांवर अंतिम विचारणा केली. कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, दोघांना स्वतंत्रपणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी विविध पुरावे आणि अहवालांबाबत त्यांच्याशी संवाद साधला. दोघांनीही आपली बाजू मांडली. सुनावणी थोडक्यात झाली असून, शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय होण्यापूर्वी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर बोलावले जाण्याची शक्यता आहे.






