संग्रहित फोटो
जळगाव : लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सासरच्या कुटुंबातील तिघांना जेवणातून उंदीर मारण्याचे विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पैसे आणि ऐवज घेऊन पसार झालेल्या दोन तरुणींना पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून अटक केली आहे. या प्रकरणी सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हाणे येथील वाल्मिक ताराचंद पाटील यांचा विवाह सुमन सहाणी हिच्याशी झाला होता. मुलाचे लग्न जमवण्यासाठी अडीच लाख रुपयांची बोली लावून परराज्यातून ही नवरी आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: अचानक खाली पडला तरुण; प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत वाचवला जीव, उड्डाणपुलावर नेमकं काय घडलं?
विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच हा धक्कादायक प्रकार घडला. 9 ऑक्टोबर रोजी फिर्यादी गणेश पाटील, त्यांचे वडील ताराचंद पाटील आणि आई सरलाबाई यांना जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमागे सुमन सहाणी आणि आरती पटेल या दोघींचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. जेवणातून विषारी पदार्थ देऊन कुटुंबातील तिघांना संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही महिला पैसे आणि ऐवज घेऊन तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वेल्हाणेच्या पोलीस पाटलांकडून या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दोन्ही संशयित महिलांचा माग काढत पोलिसांनी काही तासांतच त्यांना धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास पारोळा पोलीस करत आहेत.






