पुणे : हडपसर भागात कवालीचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी पैशांची उधळ करणारा तसेच हडपसरमधील कुख्यात गुंड टिपू पठाणसह त्याच्या भावावर गुन्हा नोंद झाला आहे. पुणे पोलिसांनी टिपूच्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. एका महिलेच्या मोकळ्या प्लॅटचा बेकायदा ताबा घेण्याचा तर त्यांना ही जागा हवी असल्यास २० लाखांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी टिपू पठाणसह त्याचा भाऊ इजाज सत्तार पठाण (वय ३९) आणि इतर ७ ते ८ जणांवर काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत ५० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. इजाज पठाण याला पोलिसांनी अटक केली असून, टिपू पठाण हा दुसऱ्या एका प्रकरणात कारागृहात आहे. त्याचा ताबा शुक्रवारी घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
टिपू पठाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर २४ गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार यांची हडपसर भागात १२९० स्केअर फुटची जागा आहे. मोकळ्या प्लॅटवर त्यांनी पत्र्याचे शेड मारले होते. परंतु, २०२२ मध्ये टिपू पठाण हा सात ते आठ साथीदारांसोबत कारमधून त्याठिकाणी गेला. ही जागा माझी असून, माझा भाऊ ईजाज याच्या नावाने ही जागा खरेदी केली असल्याचे सांगितले. त्यांना शेड खाली करून घ्यावे अन्यथा मला कशी जागा खाली करायची हे जमते अशी धमकी दिली. नंतर तो वारंवार येथे येऊन त्यांना धमकावू लागला. त्याने महिलेचे नाव खोडून त्यांना ही जागा पाहिजे असल्यास २० लाख रुपयांची खंडणी मागितली, असे तक्रारीत नमूद केले आहे. भितीपोटी महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती.
मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडाविरोधात नुकतेच आवाहन केले असून, जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न किंवा धमकावले असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर महिलेने पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. या महिलेसोबतच आणखी एका महिलेच्या घराचा ताबा देखील अश्याच पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झाला आहे. नंतर पुणे पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून इजाजला अटक केली. तर टिपू पठाणचा ताबा शुक्रवारी घेतला जाणार असल्याचे सांगितले.