बारामतीतील कोयता गॅंगवर अंकुश; थेट केली येरवडा कारागृहात रवानगी
बारामती : बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे. बारामती शहरामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या युवकांवर गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली.
अप्पर पोलीस अधिक्षक बारामती तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या यश दीपक मोहिते, शुभम उर्फ बाळू काळू जगताप (दोघे रा. आमराई, बारामती), आदित्य राजू मांढरे (रा. चंद्रमणीनगर अमराई बारामती), अनिकेत केशवकुमार नामदास (रा. दीपनगर भवानीनगर, ता. इंदापूर) या चौघांची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे साध्या कारावासासाठी रवानगी केली आहे. या चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ते योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असून, सदरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव हा शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवलेला होता.
हे सुद्धा वाचा : चोरलेल्या दोन कार पुन्हा त्याच ठिकाणी, पोलीसही चक्रावले; नेमकं काय घडलं?
शक्ती नंबरवर करा तक्रार
यापुढे जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवलेल्या व्यक्तींचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास त्या आरोपींवर याच पद्धतीची कारवाई करण्यात येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अधिक माहितीसाठी या शक्ती नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जागरूक पालक, शिक्षकांनी, तसेच नागरिकांनी शहरातील चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या, उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबरवर पाठवावी त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-विलास नाळे, पोलिस निरिक्षक
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
पुण्यातही गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.