Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर चौकशीला पुन्हा गैरहजर; आता पोलिसांनी बहिणीलाच बजावली नोटीस
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचे नाव नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात समोर आले आहे. त्यानंतर चौकशीत अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यात आर्थिक घोटाळ्यातही प्रकर्षाने समोर येऊ लागले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर समन्स बजावूनही चौकशीला गैरहजर राहिल्या. आता शिर्डी पोलिसांनी त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. त्यांना पुढील ५ दिवसांत जबाबासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
शिर्डी येथील समता पतसंस्थेत प्रतिभा यांची एकूण चार खाती असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या चारही खात्यांमधून गेल्या काही काळात २ कोटी ४० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. इतक्या मोठ्या रकमेचा स्रोत काय, याचा शोध पोलिस घेणार आहेत. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेले 100 खाते तर सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत खरात नॉमिनी असेलेले 32 खाते आहेत. त्यामुळे पोलिसांना आता पुढील तपास करायचा आहे. त्यानुसार, ही चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्या या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.
दरम्यान, अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर शिर्डीतील आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत. तेव्हापासून कल्पना फरार आहेत. अटक टाळण्यासाठी कल्पनाच्या वकिलांनी ४ एप्रिल रोजी राहाता सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी १६ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकमधील पतसंस्थांमध्ये चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने खाते असल्याचे तपासातून उघड झाले आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवे खुसाले समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक राजकीय नेतेमंडळी, मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती. खरातने अनेकांचे आधार आणि पॅन कार्ड वापरून नाशिकमधील दोन पतसंस्थांमध्ये शेकडो बेनामी खाती उघडली, त्या खात्यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
SIT कडून कसून चौकशी सुरू
या आर्थिक गैरव्यवहारानंतर आता एसआयटीने आपला मोर्चा संबंधित दोन पतसंस्थांकडे वळवला आहे. या दोन्ही पतसंस्थांचे चेअरमन आणि मॅनेजर यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बोगस खाती उघडताना नियमांचे उल्लंघन झाले का, याचा तपास पोलीस करत आहेत.






