Bihar Crime News: दोन दिवसांपूर्वी पुण्यातील खेड तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या तरूणीला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आंतरजातीय विवाहाच्या रागातून दाम्पत्यावर हल्ला करत पत्नीच्या कुटुंबियांनी पत्नीचे अपहरण केले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात एकूण १५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. बिहारमध्ये प्रेम संबंधाच्या रागातून तरूणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये पुन्हा प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका नर्सिंग विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) संध्याकाळी दरभंगाच्या बेंटा पोलीस स्टेशन परिसरातील डीएमसीएच कॅम्पसमध्ये घडली. मृत तरूणाचे नाव राहुल कुमार असे असून तो २५ वर्षांचा होता. जो सुपौल जिल्ह्यातील पिपरा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. राहूल कुमार डीएमसीएचमध्ये बीएससी नर्सिंगचा विद्यार्थी होता. प्राथमिक तपासात ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे उघड झाले आहे.
हत्येमागे प्रेमप्रकरण आणि कौटुंबिक असंतोष
पोलिस तपासात आरोपीची ओळख ४५ वर्षीय प्रेम शंकर झा अशी झाली आहे, जो सहरसा जिल्ह्यातील बाणगाव परिसरातील रहिवासी आहे. मृत राहुलचे प्रेम शंकर झा यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. तीदेखील डीएमसीएचमध्ये नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दोघांनीही एप्रिल २०२५ मध्ये प्रेमविवाह केला होता. ज्यामुळे प्रेमशंकर झा यांच्या मनात राग होता. याच रागातून प्रेम शंकर झा यांनी राहुल कुमारची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.
हत्येनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपी प्रेम शंकर झा याला पकडून मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला ताबडतोब पाटणा येथील पीएमसीएच येथे रेफर करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत राहुलचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. एसएचओ आणि एसडीपीओ घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपास सुरू केला आहे. प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानंतर या प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे.