

दोन महिलांसह तिघांना अटक
३७ लिटर गावठी दारू जप्त
बिबवेवाडी आणि लोणी काळभोरमध्ये कारवाई
पुणे : पुणे शहर आणि परिसरात गावठी दारू विक्रीचे प्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बिबवेवाडी आणि लोणी काळभोर परिसरात पोलिसांनी छापेमारी करत गावठी दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी दारू जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये नवसागर आणि रासायनिक पदार्थांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गंगाधाम परिसरात ३७ लिटर दारू जप्त
बिबवेवाडीतील गंगाधाम-मार्केट यार्ड रस्त्यावरील आईमाता मंदिराजवळील मोकळ्या जागेत गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून नागबत्ती ऊर्फ नागोली सवालसिंग राठोड (वय ४५, सध्या रा. नाझ पानपट्टीमागे, गंगाधाम रस्ता) हिला अटक केली. तिच्याकडून ३७ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या दारूमध्ये नवसागर आणि रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पोलीस हवालदार संजीव कळंबे यांनी फिर्याद दिली असून, उपनिरीक्षक सोळुंके तपास करत आहेत.
गव्हाणे वस्तीतही महिलेला अटक
बिबवेवाडीतील गव्हाणे वस्ती परिसरातही पोलिसांनी कारवाई केली. येथे गावठी दारू विक्री केल्याप्रकरणी निकिता आदित्य राठोड (वय २१, रा. गव्हाणे वस्ती, बिबवेवाडी) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून विषारी गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रतीक्षा चंदनिशव यांनी फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.
लोणी काळभोरमध्येही कारवाई
दरम्यान, लोणी काळभोर परिसरातील सिद्राममळा येथे गावठी दारू विक्री केल्याप्रकरणी दुर्गेश तानाजी धायगुडे (वय २९) याला पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस हवालदार संतोष वणवे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक माळी पुढील तपास करत आहेत. या सलग कारवायांमुळे पुण्यातील अवैध गावठी दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याला आणि जीविताला धोका निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.