दाऊद आणि बिष्णोईचे फोटो स्टेटसला ठेवणं भोवलं; पुण्यात तिघांना अटक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांची हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे फोटो स्टेट्स ठेवत गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिघांनी हे स्टेट्स ठेवले होते. लोणी काळभोर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी उघडकीस आला.
सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. भाग्यश्री संचेती (डांगळे) यांनी युक्तिवाद केला, आरोपींचा दाऊद इब्राहिम टोळीशी काही संबंध आहे का याचा तपास करायचा आहे. त्यांनी स्टोरीवर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेट्स कोठे बनविले, त्यांना स्टेट्स ठेवण्यास कोणी प्रवृत्त केले, त्यासाठी कोणी चिथावणी दिली आहे का, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड. संचेती यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.