नवी दिल्ली : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानं हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. येत्या दहा दिवसांसाठी नितेश राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच नितेश राणेंवरील आरोप खोटे असून राजकीय सुडापोटी करण्यात आलेले हे आरोप असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचा राणेंच्या वकिलांनी सांगितलं.
नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला.
सर्वोच्च न्यायालयाने आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यासोबतच १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर रहावं लागेल. त्यामुळे नितेश राणे हे १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर होऊन नियमित जामीन अर्ज दाखल करु शकणार आहेत. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे.