Anupam Kher : महिला आरक्षण विधेयकावर अनुपम खेर यांचे स्पष्ट मत! मदुराईतील दीपप्रज्वलनावरही व्यक्त केला आनंद

Anupam Kher :महिला आरक्षण विधेयकावर अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घरात महिला ३३ नव्हे, तर ८० टक्के सक्षम असल्याचे म्हणत त्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवला.
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Published on: 
Updated on: 

समाजात आणि राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर अनेकदा वेगवेगळी मते मांडली जातात. दरम्यान, अभिनेते अनुपम खेर यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकामुळे आपल्याला खूप आनंद झाला असून, महिलांचे सामर्थ्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महिला आरक्षण विधेयकाबाबत अनुपम खेर यांची प्रतिक्रिया

एएनआयने अनुपम खेर यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये माध्यमांनी त्यांना महिला आरक्षण विधेयकाबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले, “मला खूप आनंद झाला आहे. आपल्या घरांमध्ये महिला सक्षम आहेत... ३३ टक्के नव्हे, तर ८० टक्के. कधीपासून आईच सगळं करते, पत्नीच सगळं करते. त्यामुळे मला विश्वास आहे की हे विधेयक मंजूर व्हायलाच हवं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे.”

या वक्तव्याद्वारे त्यांनी महिलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. घराची जबाबदारी सांभाळण्यापासून ते समाज आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्यापर्यंत महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले.

मंदिरात असताना राजकीय विषयावर बोलण्यास दिला नकार

महिला आरक्षण विधेयकावर भाष्य करण्यापूर्वी अनुपम खेर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारले. मात्र, मंदिरात असताना अशा विषयांवर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

“आज मी मंदिरात आलो आहे. अशा विषयांवर भाष्य करणे अनुचित आहे. मी केवळ भक्तीभावाने मंदिरात आलो आहे. ज्या गोष्टीचा मी विचार केलेला नाही, ती मला बोलायची नाही. आज भक्तीबद्दल, शांततेबद्दल बोलले जाईल. ज्यांना उपायांची गरज आहे, त्यांच्याबद्दलही आपण बोलू; पण आज मला अशा कोणत्याही गोष्टीवर बोलायचे नाही,” असे अनुपम खेर म्हणाले.

मदुराईतील दीपप्रज्वलन सोहळ्याबद्दल व्यक्त केला आनंद

यावेळी अनुपम खेर यांनी मदुराईमध्ये झालेल्या दीपप्रज्वलन सोहळ्याबद्दलही आनंद व्यक्त केला. “आपल्या दीपप्रज्वलन सोहळ्याच्या विजयाबद्दल आणि सनातनाच्या विजयाबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो,” असे ते म्हणाले.

दरम्यान, अनुपम खेर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचा ‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी आयुष्मान खुरानाच्या आजोबांची भूमिका साकारली होती. याशिवाय, आगामी ‘रामायण’ चित्रपटात त्यांनी जटायू या पात्राला आवाज दिला आहे.