

Esha Deol Bharat Takhtani: बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा एक्स पती सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. भरत तख्तानी आणि ईशा आता पती-पत्नी नसले, तरी त्यांच्यातील मैत्रीपूर्ण नाते कायम असल्याचे दिसत आहे. घटस्फोटानंतरही हे दोघे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. आता पुन्हा एकदा ईशा आणि भरतने त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत थँक्सगिव्हिंग साजरा केला. या खास सेलिब्रेशनचे फोटो भरतने सोशल मीडियावर शेअर केले असून, ते सध्या चर्चेत आले आहेत.
भरत तख्तानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर थँक्सगिव्हिंग सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ईशा आणि भरत मित्रांच्या मोठ्या ग्रुपसोबत दिसत आहेत. सर्वजण हसत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. याशिवाय, भरतने सेलिब्रेशनमधील आणखी काही झलक शेअर केल्या आहेत. त्यामध्ये मित्रांसोबतची धमाल, जेवणाचे टेबल आणि उत्सवासाठी केलेली सजावट पाहायला मिळत आहे.
या फोटोंसोबत भरतने, "या कुटुंबाबद्दल मी कायम कृतज्ञ राहीन," असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टवरून मित्रांसोबतचा हा खास दिवस त्याने आनंदात साजरा केल्याचे दिसून येते.
काय आहे थँक्सगिव्हिंग सणाचे महत्त्व?
थँक्सगिव्हिंग हा अमेरिकेतील पारंपरिक सण आहे. या दिवशी कुटुंबीय, मित्र आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी हा सण साजरा केला जातो. २०२६ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी थँक्सगिव्हिंग साजरा करण्यात आला. या सणाचा उगम १६२१ मध्ये पहिल्या कापणीनंतर आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक मेजवानीशी जोडला जातो. १९४१ मध्ये अमेरिकन काँग्रेसने नोव्हेंबरचा चौथा गुरुवार ही या सणाची अधिकृत तारीख निश्चित केली.
ईशा आणि भरत यापूर्वीही अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. नुकतेच ईशाच्या ‘प्रताप’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला भरत उपस्थित होता. ईशाला प्रोत्साहन देण्यासाठी तो या कार्यक्रमाला पोहोचला होता. यावेळी त्याने ईशा, तिची आई हेमा मालिनी आणि बहीण अहना देओल यांच्यासोबत फोटोसाठी पोज दिली होती.
याच महिन्याच्या सुरुवातीला ईशा आणि भरतने एकत्र दिवाळी साजरी केली होती. यावेळी दोघांनी पापाराझींसाठीही पोज दिल्या होत्या. त्याआधी मे महिन्यात ते जवळच्या मित्रांसोबत रविवारी दुपारच्या जेवणासाठी एकत्र दिसले होते. त्यामुळे घटस्फोटानंतरही दोघांनी एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध जपल्याचे दिसत आहे.
२०१२ मध्ये थाटात बांधली होती लग्नगाठ
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी २९ जून २०१२ रोजी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्नगाठ बांधली होती. पारंपरिक दक्षिण भारतीय पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. मात्र, काही वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता पती-पत्नी म्हणून एकत्र नसले, तरी विविध प्रसंगी एकत्र येत त्यांनी मैत्रीपूर्ण नाते कायम ठेवल्याचे त्यांच्या अलीकडील फोटोंमधून दिसून येत आहे.