(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Janhavi Killekar: अभिनेत्री जान्हवी किल्लेकर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, तर तीही टीकाकारांना रोखठोक उत्तर देताना दिसते. मात्र, यावेळी जान्हवीने केलेल्या एका कौतुकास्पद कृतीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वतःच्या वाढदिवसाची पार्टी न देण्याचा निर्णय घेत तिने त्या पैशांतून SMA या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या गार्गीच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे, जान्हवीने आपला वाढदिवस सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील १०० अनाथ मुलांसोबतही साजरा केला.
जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. स्वतःच्या वाढदिवसाचा आनंद या मुलांसोबत वाटून घेत तिने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना जान्हवीने सांगितले की, तिने आणि तिचा मित्र अभिनेता ओम यादव याने वाढदिवसाची पार्टी देण्याऐवजी आश्रमातील १०० अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या मुलांच्या चेहऱ्यावरील हसू आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद हेच आपल्यासाठी सर्वात सुंदर गिफ्ट असल्याची भावना तिने व्यक्त केली.
चिमुकल्या गार्गीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत
SMA या आजाराशी लढा देणाऱ्या चिमुकल्या गार्गीच्या उपचारांसाठी जान्हवी किल्लेकर आणि ओम यादव यांनी मिळून १,११,१११ रुपयांची मदत दिली. जान्हवीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवर खर्च करण्याऐवजी गरजू चिमुकलीच्या उपचारांसाठी मदत करण्याचा त्यांचा निर्णय अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आपल्या पोस्टमध्ये जान्हवीने गार्गीच्या उपचारांसाठी आवश्यक असलेली १० कोटी रुपयांची रक्कम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचेही नमूद केले. यासाठी तिने महाराष्ट्रातील मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
View this post on Instagram
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना जान्हवीने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने लिहिले, “चिमुकल्या गार्गीसाठी ₹१,११,१११/- रुपयांची छोटीशी मदत वाढदिवसाची पार्टी रद्द करून गार्गीकडे सुपूर्त.”
पुढे तिने आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले. त्या निरागस चेहऱ्यांवरील हसू आणि डोळ्यांतील आनंद हेच आपल्यासाठी सर्वात सुंदर आणि महागडे गिफ्ट असल्याचे तिने म्हटले. तसेच, “एक अश्रू पुसावयास जरी जन्म कामास आला,” या ओळींचा उल्लेख करत या उपक्रमामुळे मनाला वेगळेच समाधान मिळाल्याचेही तिने सांगितले.
जान्हवी किल्लेकरच्या या कृतीमुळे तिचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. वाढदिवस साजरा करण्याची पद्धत बाजूला ठेवून गरजू मुलांना मदत करण्याचा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा तिचा हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.






