(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सुरुचीने शेअर केली आनंदाची बातमी
मराठी कलाकारांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
डिसेंबर २०२३ मध्ये थाटला होता संसार
Suruchi Adarkar : मराठी मनोरंजनविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे आई-बाबा झाले आहेत. सुरुचीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे, घटस्थापनेच्या शुभदिनी ही गोड बातमी समोर आल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
सुरुची अडारकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या पोस्टमध्ये तिने लिहिले, “खूप आनंदाने आणि अभिमानाने संपूर्ण जगाला हे कळवण्यास आनंद होत आहे की आम्हाला मुलगी झाली आहे.”
या पोस्टसोबतच सुरुचीने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले, “टीममध्ये आम्ही दोघेच होतो. आता आयुष्याने आम्हाला आमचा सर्वात सुंदर सहकारी दिला आहे.” या खास शब्दांत तिने आपल्या आयुष्यात आलेल्या नव्या पाहुणीचं स्वागत केलं आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मराठी कलाकारांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
सुरुची आणि पियुष यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झाल्याची बातमी समोर येताच अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘वोहाे’ अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तर अभिनेत्री श्रेया बुगडेने, “माय बेबीज, गॉट अ बेबी. हॅपी अत्तू,” अशी कमेंट करत आपला आनंद व्यक्त केला.
याशिवाय ऐश्वर्या नारकर, अद्वैत दादरकर, शर्वरी कुलकर्णी, कश्मिरा कुलकर्णी, नंदिता पाटकर, अक्षया गुरव, पल्लवी वैद्य, मेघना एरंडे, अभिजीत खांडकेकर आणि गिरिजा प्रभू यांसह अनेक कलाकारांनी सुरुची आणि पियुष यांचं अभिनंदन केलं आहे. अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेनेही, “खूप अभिनंदन. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुलगी झाली. आई दुर्गेचा आशीर्वाद,” अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या परीचं आगमन झाल्याने या जोडप्याच्या आनंदात भर पडली आहे. आई-बाबा झाल्याची गोड बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून या नव्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






