(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mirzapur: The Movie: बहुचर्चित ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनाला आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सिनेमाशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) प्रमाणपत्र मिळालं असून, सिनेमाचा रनटाइमही समोर आला आहे.
CBFCच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. एक्सेल एंटरटेनमेंटने सिनेमाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यानंतर मुंबईतील प्रादेशिक कार्यालयाकडून सिनेमाला प्रमाणपत्र देण्यात आलं.
सिनेमाला A सर्टिफिकेट मिळालं आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ प्रौढ प्रेक्षकांसाठी असणार आहे. ‘मिर्झापूर’च्या आधीच्या सीझनप्रमाणेच सिनेमातही हिंसा, अॅक्शन आणि गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी पाहायला मिळणार असल्याने A सर्टिफिकेट मिळाल्याचं मानलं जात आहे.
‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या रनटाइमनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा तब्बल १९७.१९ मिनिटांचा आहे. म्हणजेच सिनेमाचा रनटाइम जवळपास ३ तास १७ मिनिटं इतका आहे.
CBFCच्या माहितीनुसार, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची कथा मिर्झापूरच्या गादीभोवती फिरणार आहे. जुन्या शत्रूंचं पुन्हा आगमन आणि नव्या धोक्यांमुळे मिर्झापूरच्या सत्तेसाठीची लढाई आणखी तीव्र होणार आहे.
रक्ताचा बदला घेतला जाणार असून, सत्तेची भूक असलेले अनेक दावेदार शहराच्या हिंसक अंडरवर्ल्डवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकमेकांशी संघर्ष करताना दिसणार आहेत. त्यामुळे सिनेमा अॅक्शन आणि क्राइम थ्रिलरचा जबरदस्त डोस देणार असल्याचं स्पष्ट होतं.
दिग्दर्शक गुरमीत सिंह यांनी या क्राइम थ्रिलर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात अली फजल गुड्डू पंडित, दिव्येंदू शर्मा मुन्ना त्रिपाठी आणि पंकज त्रिपाठी कालीन भैया या लोकप्रिय भूमिकांमध्ये पुन्हा दिसणार आहेत.
विशेष म्हणजे, ‘बबलू पंडित’ या भूमिकेत यावेळी अभिनेता जितेंद्र कुमार दिसणार आहे. या भूमिकेत यापूर्वी विक्रांत मॅसी दिसला होता.
‘मिर्झापूर’ फ्रँचायझीची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. पहिला सीझन अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर २०२० मध्ये दुसरा आणि २०२४ मध्ये तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला.
आता या लोकप्रिय फ्रँचायझीचा विस्तार मोठ्या पडद्यावर होत आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






