Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Sonam Wangchuk Aamir Khan: आमिर खानचा ‘3 इडियट्स’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांवरील दबाव आणि स्वतःच्या आवडीचा मार्ग निवडण्याचा संदेश या सिनेमातून देण्यात आला होता. चित्रपटातील रँचो हे पात्र आणि लडाखमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यात साम्य असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, आता या विषयाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे.
सोनम वांगचुक सध्या त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे चर्चेत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलन आणि उपोषणही केलं आहे. याच काळात आमिर खानने ‘3 इडियट्स’मधील रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचं नाकारल्याचं समोर आलं. आमिरच्या या भूमिकेवर आता सोनम वांगचुक यांनी मिश्कील पद्धतीने उत्तर दिलं आहे.
चित्रपट तयार होत असताना आपली सोनम वांगचुक यांच्याशी वैयक्तिक ओळख नव्हती, असं आमिर खानने यापूर्वी सांगितलं होतं. रँचोची व्यक्तिरेखा थेट वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं होतं. आमिरच्या या वक्तव्याबद्दल सोनम वांगचुक यांना एका पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरलं.
आमिर खानच्या वक्तव्यावर बोलताना सोनम वांगचुक यांनी थेट वाद घालण्याऐवजी विनोदी अंदाज निवडला. त्यांनी आमिरच्या ‘गजनी’ चित्रपटाचा संदर्भ देत म्हटलं की, कदाचित आमिरला काही गोष्टी आठवत नसतील. Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini:
वांगचुक यांच्या मते, आमिर त्यांच्यासोबत यापूर्वी भेटले होते. एवढंच नाही तर एका पुरस्कार सोहळ्यातही दोघे एकाच ठिकाणी उपस्थित होते. त्या प्रसंगाची आठवण करून देताना त्यांनी आमिरवर हलकाफुलका टोला लगावला. त्यांच्या म्हणण्याचा सूर असा होता की, एखाद्या कलाकाराने एखादी भूमिका इतकी मनापासून साकारली असेल की त्या पात्राचा परिणाम त्याच्या आठवणींवरही झाला असावा. त्यामुळेच कदाचित जुन्या भेटीची आठवण आमिरला राहिली नसावी, असं त्यांनी विनोदाने सुचवलं.
सोनम वांगचुक यांनी एक महत्त्वाची गोष्टही स्पष्ट केली. त्यांच्या मते, ‘3 इडियट्स’ हा त्यांचा थेट जीवनपट नाही. म्हणजेच चित्रपटातील प्रत्येक घटना किंवा पात्र त्यांच्या आयुष्याची हुबेहूब नक्कल आहे, असं म्हणता येणार नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या कामाचा, विचारांचा किंवा अनुभवांचा चित्रपटावर प्रभाव पडू शकतो. वांगचुक यांच्या मते, ‘3 इडियट्स’च्या बाबतीतही असं झालं असण्याची शक्यता आहे.






