( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Salman Khan 38 Years: बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान याने भारतीय सिनेसृष्टीत आपल्या कारकिर्दीची तब्बल ३८ वर्षे पूर्ण केली आहेत. एका छोट्या सहाय्यक भूमिकेतून सुरू झालेला त्याचा प्रवास आज भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि प्रभावी स्टारडमच्या कहाण्यांपैकी एक ठरला आहे. या खास टप्प्यानिमित्त सलमान खान फिल्म्सने सोशल मीडियावर एक खास सेलिब्रेशन व्हिडिओ शेअर करत त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीला उजाळा दिला आहे.
या व्हिडिओमध्ये सलमान खान याच्या आयकॉनिक भूमिका, अॅक्शन सीन्स आणि रुपेरी पडद्यावरील अनेक संस्मरणीय क्षणांची झलक पाहायला मिळते. व्हिडिओसोबत “३८ वर्षे. एक शानदार प्रवास. एक असे नाव, जे एक भावना बनले.” असे खास कॅप्शनही शेअर करण्यात आले आहे.
सलमान खानच्या ३८ वर्षांच्या प्रवासाचा आनंद त्याच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर मोठ्या उत्साहात साजरा केला. भारतासह जगभरातील चाहत्यांनी आपल्या आवडत्या सुपरस्टारच्या कारकिर्दीतील खास क्षण शेअर केले. पाहता पाहता #38YearsOfSalmanKhanEra हा हॅशटॅग X वर ट्रेंड होऊ लागला.
सलमान खानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. मात्र, त्याची स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
यानंतर १९८९ मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. ‘प्रेम’ या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप पाडली की ते रातोरात सुपरस्टार झाले. या चित्रपटामुळे त्यांची रोमँटिक हिरो म्हणून नवी ओळख निर्माण झाली.
जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत सलमान खानने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. रोमँटिक हिरो, कॉमेडी, फॅमिली ड्रामा आणि अॅक्शन स्टार अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
‘हम आपके हैं कौन..!’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘वांटेड’, ‘दबंग’, ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला. ‘टायगर’ या भूमिकेने तर त्यांच्या अॅक्शन स्टारच्या प्रतिमेला आणखी मोठी उंची दिली.
अभिनयासोबतच सलमान खानने निर्मिती क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्या प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित ‘चिल्लर पार्टी’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सलमान खानसाठी स्टारडम केवळ बॉक्स ऑफिसपुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याच्या सामाजिक कार्यामुळेही त्याचा मोठा चाहतावर्ग त्याच्याशी जोडला गेला आहे. आज जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी ते केवळ अभिनेता नसून भारतीय पॉप कल्चरमधील एक मोठे आयकॉन आहेत.
३८ वर्षांनंतरही सलमान खान याची लोकप्रियता आणि स्टारडम कायम आहे. ‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या अॅक्शन अवतारापर्यंतचा त्याचा हा प्रवास आजही चाहत्यांच्या मनात तितकाच खास आहे.






