'झालं बाबा एकदाचं लग्न...' संतोष जुवेकरने दिली आनंदाची बातमी; VIDEO पाहून चाहतेही खुश

मराठी अभिनेता संतोष जुवेकर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चाहते त्याला लग्न कधी करणार, असा प्रश्न नेहमी विचारतात. यावर अभिनेत्याने भन्नाट अंदाजात उत्तर देत 'एकदाचं लग्न लागलं ओ' असं कॅप्शन देऊन व्हिडीओ शेअर केला.
Santosh Juvekar (सौजन्य- सोशलमीडिया)
Santosh Juvekar (सौजन्य- सोशलमीडिया) Santosh Juvekar (सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • संतोष जुवेकरचा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल.

  • अभिनेत्याने केलं तुळशीचं लग्न.

  • व्हिडीओवर चाहत्यांच्या लाइक्स-कमेंट्सचा पाऊस.

मराठी सिनेमातला हँडसम हिरो संतोष जुवेकर मालिका असो किंवा सिनेमा, त्याने नेहमीच आपल्या कामाने लोकांना वेड लावलंय. त्याचे फॅन्स तर लाखोंमध्ये आहेत. पण कामापेक्षा जास्त चर्चा होते ती एकाच विषयावर संतोषचं लग्न कधी होणार?सोशल मीडियावर तो नेहमी ऍक्टिव्ह असतो. फोटो टाकला की कमेंटमध्ये एकच प्रश्न येतो, "दादा, लग्न कधी?" आता तर लोकांनी त्याला विचारून विचारून कंटाळा आणला. मग संतोषने पण ठरवलं, आता या प्रश्नाला उत्तर द्यायचंच. आणि त्याने असं उत्तर दिलं की सगळेच चक्रावले.

त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला आणि वर लिहिलं, "एकदाचं लग्न लागलं ओ!" बस्स, मग काय, व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाला. लोकांना वाटलं, खरंच संतोषने लग्न केलं की काय?

व्हिडिओत संतोष काय बोलला?

व्हिडिओ सुरू होतो आणि संतोष म्हणतो, "तुम्ही मला रोज विचारता ना, लग्न कधी? लग्न कधी? आज तुमच्या सगळ्यांचं ऐकून आणि घरच्यांनी मागे लागल्यामुळे मी आज लग्न करतोय."हे ऐकून तर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकलाच. सगळ्यांना वाटलं, चला, अखेर संतोषने लग्न केलं. पण पुढे कॅमेरा फिरतो आणि समोर दिसतं ते वेगळंच.

खरं लग्न कोणाचं होतं?

समोर तुळशीचं लग्न लागत होतं. संतोष स्वतःच्या लग्नाबद्दल नाही, तर तुळशीच्या लग्नाबद्दल बोलत होता. त्याने सगळ्यांना अगदी मस्त टोपी घातली होती.व्हिडिओत त्याची आई पण दिसते. संतोष हातात बाळकृष्णाची मूर्ती धरून उभा असतो. तो म्हणतो, "बघा, भगवान श्रीकृष्ण हेच नवरोबा आहेत. आणि मी त्यांना धरून उभा आहे."

मग तुळशीचं लग्न लागतं. विधी पूर्ण होतात. आणि संतोष म्हणतो, "झालं बाबा एकदाचं लग्न, श्रीकृष्णाचं तुळशीशी... चला या, दर्शन घ्या."• शेवटी डान्सने धमाल केलीव्हिडिओ इथेच संपत नाही. शेवटी संतोष "नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली" या गाण्यावर मस्त ठेका धरतो. त्याचा तो अंदाज बघून लोक पोट धरून हसले.

या व्हिडिओवर आता लाईक्स आणि कमेंट्सचा धबधबा सुरू आहे. एकाने तर कमेंटमध्ये लिहिलंय, "मी हे लग्न बघूच शकत नाही, बघितलं पण नाही तिकडे." तर दुसऱ्याने त्याला शुभेच्छा दिल्यात.सांगायचं तर संतोषने या एका व्हिडिओने सगळ्यांना खुश केलंय. त्याच्या लग्नाच्या प्रश्नाला त्याने त्याच्या खास स्टाईलमध्ये उत्तर दिलंय. त्याचं खरं लग्न कधी होणार हे तर वेळच सांगेल, पण सध्या तरी त्याने तुळशीच्या लग्नाने सगळ्यांची मनं जिंकून घेतलीत.