( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shiv Thakare Birthday: अभिनेता शिव ठाकरे हा मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. शिव ठाकरे आज, ९ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाड़ी’ यांसारख्या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेल्या शिवने आता आणखी एक मोठं यश आपल्या नावावर केलं आहे. ‘द ५०’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाची ट्रॉफी शिव ठाकरेने आपल्या नावावर केली आहे. मात्र, आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आर्थिक अडचणी, संघर्ष आणि अनेक छोट्या-मोठ्या कामांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज मोठ्या रिअॅलिटी शोच्या विजेतेपदापर्यंत पोहोचला आहे.
शिव ठाकरेचा संबंध महाराष्ट्रातील अमरावतीच्या एका साध्या मराठी कुटुंबाशी आहे. कुटुंबाने अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला. आयुष्याच्या एका टप्प्यावर शिव झोपडपट्टीतही राहिला. परिस्थितीशी दोन हात करत त्याने लहानपणापासूनच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला.
शिवने ‘रोडीज’च्या ऑडिशनदरम्यान आपल्या संघर्षाबद्दल सांगितलं होतं. कुटुंबाला मदत करण्यासाठी त्याने वडिलांच्या पानटपरीवर काम केलं. याशिवाय कधी पेपर टाकले, तर कधी दूधाची पाकिटं विकली. त्याची मोठी बहीणही या काळात त्याला मदत करत होती.
वडिलांच्या पानटपरीवर काम करण्यासोबतच शिवने आपल्या नृत्यकौशल्याचा उपयोग पैसे कमावण्यासाठी केला. तो आपल्या परिसरातील मुलांना नृत्य शिकवत असे. यातून त्याला दरमहा १० हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत कमाई होत होती.
या कमाईतून तो कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. स्वतःवरही खर्च करत होता आणि बहिणीच्या लग्नासाठी पैसे वाचवत होता. त्याच्या मेहनतीमुळे कुटुंबाची परिस्थिती हळूहळू सुधारली आणि ते झोपडपट्टीतून थोड्या चांगल्या ठिकाणी राहायला गेले.
शिव ठाकरेने रिअॅलिटी शो ‘रोडीज’मधून आपल्या करिअरला सुरुवात केली. ऑडिशनमध्ये त्याने केवळ आपली प्रतिभाच दाखवली नाही, तर आयुष्यातील संघर्ष आणि कौटुंबिक परिस्थितीही स्पष्टपणे सांगितली.
शिवच्या आत्मविश्वासाने आणि संघर्षाच्या कहाणीने गँग लीडर्स प्रभावित झाले. त्याला आपल्या गँगमध्ये घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. मात्र, शिवने रणविजयच्या गँगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आपण निवड झालो तर त्यांच्या टीममध्ये सहभागी होऊ, असं त्याने आईला वचन दिलं होतं. शिवचं हे बोलणं ऐकून रणविजयही भावुक झाले होते. या शोमध्ये शिव सेमीफायनलपर्यंत पोहोचला.
‘रोडीज’नंतर शिवच्या करिअरला मोठी दिशा मिळाली. त्याला ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या शोमध्ये शिवने आपल्या चतुर खेळी आणि रणनीतीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
अखेर त्याने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकली आणि त्याची लोकप्रियता आणखी वाढली. त्यानंतर ‘बिग बॉस हिंदी’मध्येही त्याने आपल्या खेळाची छाप पाडली.
शिवचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. संघर्ष कितीही मोठा असला, तरी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर परिस्थिती बदलता येते, हे शिव ठाकरेच्या प्रवासातून दिसून येतं.






