(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
The Dirty Picture: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा गाजलेला चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात विद्या बालनने १९८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी विद्याचे विशेष कौतुक झाले होते. आता तब्बल १५ वर्षांनंतर या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निर्माती एकता कपूरने ‘द डर्टी पिक्चर २’वर काम सुरू असल्याचे सांगितले आहे.
एकता कपूरने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवरील संभाषणादरम्यान या आगामी चित्रपटाबाबत माहिती दिली. सध्या ती काही मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत असून, त्यापैकी ‘द डर्टी पिक्चर २’ हा एक महत्त्वाचा चित्रपट असल्याचे तिने सांगितले. या चित्रपटाची पटकथा तिच्याकडे आली असून, १५ वर्षांनंतर ही कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याची तिची तयारी सुरू आहे.
याबाबत बोलताना एकता कपूर म्हणाली की, ती एका मोठ्या चित्रपटावर काम करत आहे. ‘द डर्टी पिक्चर २’ची योजना आखत असून, यावेळी तिच्याकडे सांगण्यासारखी एक खास कथा आहे. त्यामुळे या सिक्वेलमध्ये नेमके काय पाहायला मिळणार, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
यावेळी कोणत्या स्त्रीची कथा उलगडणार?
‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यापासून प्रेरित होता. चित्रपटात एका महिलेचा प्रवास, तिची लैंगिकता आणि समाजाकडून तिला मिळणारी वागणूक यांसारखे विषय मांडण्यात आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि विद्या बालनच्या अभिनयाचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.
चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलताना एकता कपूरने यावेळीही एका स्त्रीची कथा सांगितली जाणार असल्याचे संकेत दिले. मात्र, ही कथा नेमकी कोणाच्या आयुष्यावर आधारित असेल, याचा खुलासा तिने केलेला नाही. त्यामुळे ‘द डर्टी पिक्चर २’मध्ये कोणत्या महिलेचा प्रवास पाहायला मिळणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
‘द डर्टी पिक्चर २’ची घोषणा झाल्यानंतर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कोण असेल, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. पहिल्या भागात विद्या बालनने सिल्क स्मिताची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, सिक्वेलमध्ये विद्या बालन पुन्हा दिसणार की नव्या अभिनेत्रीची निवड केली जाणार, याबाबत एकता कपूरने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
चित्रपटाची अधिकृत कास्ट, कथानक आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे ‘द डर्टी पिक्चर २’बाबतच्या पुढील अपडेट्सकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






