
फोटो सौजन्य - social media
अमेरिकेत गायी तसेच इतर प्राण्यांमध्ये इन्फ्लुएंझा ए H5N1 बर्ड फ्लू सारखा संसर्ग आढळून आला आहे.
USDA च्या मते, दुग्धशाळेत काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये 1 एप्रिल 2024 रोजी बर्ड फ्लूची लागण झाल्याची पहिले प्रकरण नोंदवले गेले. बर्ड फ्लू विषाणूच्या जागतिक अहवालानुसार, हा विषाणू गायीपासून माणसात पसरतो. या अहवालात तीन अमेरिकन बर्ड फ्लू रुग्णांचा थेट गायींच्या संपर्कात आल्याचे नमूद आहे. भारतातील एका ४ वर्षाच्या मुलाला बर्ड फ्लूची नुकतीच लागण झाली आहे.
अगोदर डेन्मार्क आणि कॅनडामध्ये ब्लड फ्लूचे विषाणू आढळले. याआधी बर्ड फ्लूची प्रकरणे अनेकदा पक्ष्यांमध्ये दिसली होती, परंतु आता ती लाखो प्राण्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे बर्ड फ्लू हा गंभीर धोका बनत चालला आहे, असं दिसून येत आहे. जगभरात बर्ड फ्ल्यूचे केसेस येत असताना भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एका ४ वर्षीय बालकाला बर्ड फ्ल्यू झाल्याचे प्रकरण समोर येत आहे. आजपर्यंत भारतात २ जणांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. पहिले प्रकरण २०१९ मध्ये आले होते.
संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात आल्यावर बर्ड फ्लूचा धोका वाढतो. संसर्ग झालेल्या पोल्ट्री फार्ममध्ये गेल्यास या आजाराचा धोका वाढतो. संक्रमित पक्ष्याच्या नाकातून, तोंडातून आणि डोळ्यांमधून बाहेर पडणाऱ्या द्रवामुळेही हा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. संक्रमित पक्ष्याची अंडी किंवा मांस खाल्ले असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते.
लोक अनेकदा बर्ड फ्लूच्या लक्षणांना सीझनल फ्लूचे लक्षण समजून त्याकडे दुर्लक्ष करत चूक करत आहेत.
बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे खोकला आणि घसा खवखवणे, ताप, सर्दी आणि नाकातून सतत पाणी वाहणे, हाडांमध्ये वेदना तसेच थकवा जाणवणे, डोके आणि छातीत तीव्र वेदना, भूक न लागणे इ. जर अशी लक्षणे कुणाला जाणवत असतील तर त्याला हलक्यात घेऊ नये. कारण ही बर्ड फ्लूची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.