कोरोना जरी अटोक्यात आल्याचं दिसत असलं तरी त्यासारख्या इतर विषाणूंचा धोका मात्र कायम असल्याचं दिसून येतंय. कोरोनानंतर आता MERS-CoV व्हायरस चा धोका असून आतापर्यंत 27 देशांमध्ये त्याचा प्रसार झाल्याचं दिसून येतंय. महत्त्वाचं म्हणजे या व्हायरसवर अद्याप कोणतीही लस शोधण्यास अपयश आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबीमध्ये MERS-CoV या व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एका 20 वर्षीय तरूणाला संसर्ग झाल्यानंतर गेल्या महिन्यात अबू धाबीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस (MERS-CoV) या आजाराने ग्रस्त असल्याचे तपासात समोर आले आहे. हा विषाणू काय आहे, तो कसा पसरतो आणि त्याची लक्षणे आणि उपचार काय आहेत हे जाणून घेऊया.
डब्ल्यूएचओने पीडितेच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची देखील तपासणी केली आहे. परंतु व्हायरस कुठून पसरला हे माहित नाही. हा विषाणू प्रामुख्याने उंटांसारख्या प्राण्यांद्वारे प्रसारित केला जातो असे मानले जात आहे.
MERS-CoV विषाणू कसा पसरतो?
हा व्हायरस प्राणी आणि लोकांमध्ये पसरणारा एक झुटोनिक विषाणू आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियातील लोकांना बहुतेक संक्रमित उंटांच्या असुरक्षित संपर्कामुळे या व्हायरसची लागण झाली आहे.
MERS-CoV विषाणूची लक्षणे
1. ताप
2. खोकला
3. श्वास घेण्यामध्ये अडथळा
4. काही प्रकरणांमध्ये न्यूमोनिया देखील होतो.
MERS-CoV विषाणूवरील उपचार
या विषाणूचा नायनाट करण्यासाठी अद्याप कोणताही निश्चित उपचार नाही. या विषाणूच्या लसींवर काम सुरू असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितलं आहे.