नवी दिल्ली : प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) याच्याशी संबंधित लैंगिक छळाच्या आरोपांमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर खासदार रेवण्णा याला जेडीएसमधून निलंबित करण्यात आले. महिला अत्याचार प्रकरणात फरार असलेला प्रज्वल रेवण्णा हा अखेर जर्मनीतून भारतात दाखल झाला. बंगळुरु विमानतळावर पोहोचताच प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान 33 वर्षीय प्रज्वल रेवन्ना याच्या हजारो व्हिडिओ क्लिप समोर आल्या होत्या. रेवण्णावर त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणींवर बलात्कार आणि धमकावल्याचा आरोप होता. या व्हिडिओनंतर अनेक महिलाही पुढे आल्या आणि रेवण्णाने आपल्यासोबत अनेकदा चुकीचे कृत्य केल्याचा आरोप केला. जेव्हा आरोप झाले त्यानंतर तो भारताबाहेर होता. तेव्हापासून त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु होते. अखेर जेव्हा कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला इंटरपोलने प्रज्वल रेवण्णाच्या भारतात येण्यासंदर्भात माहिती दिली होती.
यानंतर बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेसाठी पूर्वतयारी करुन ठरली होती. बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीनं प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच अटकेची कारवाई केली.
सकाळी दहा वाजता एसआयटीसमोर
प्रज्वल रेवण्णानं एसआयटी चौकशीसाठी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं होतं. बुधवारी प्रज्वल रेवण्णानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर बंदोबस्त वाढवला होता.