Kashi Kartik Purnima : काशीमध्ये कार्तिक पौर्णिमेला श्रद्धेचा महापूर! 'हर हर महादेव'च्या जयघोषाने गंगाघाट दुमदुमले

कार्तिक पौर्णिमेनिमित्त वाराणसीतील काशीमध्ये गंगास्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली. 'हर हर महादेव'च्या जयघोषात भाविकांनी गंगास्नान, सूर्याला अर्घ्य आणि दानधर्म केला. बाबा विश्वनाथ मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
Kashi Kartik Purnima : काशीमध्ये कार्तिक पौर्णिमेला श्रद्धेचा महापूर! 'हर हर महादेव'च्या जयघोषाने गंगाघाट दुमदुमले (फोटो सौजन्य : आयएएनएस)
Kashi Kartik Purnima : काशीमध्ये कार्तिक पौर्णिमेला श्रद्धेचा महापूर! 'हर हर महादेव'च्या जयघोषाने गंगाघाट दुमदुमले (फोटो सौजन्य : आयएएनएस)Kashi Kartik Purnima : काशीमध्ये कार्तिक पौर्णिमेला श्रद्धेचा महापूर! 'हर हर महादेव'च्या जयघोषाने गंगाघाट दुमदुमले (फोटो सौजन्य : आयएएनएस)
Published on: 
Updated on: 
  • मध्यरात्रीपासूनच घाटांवर गर्दी

  • अन्न आणि उबदार कपड्यांच्या दानाला महत्त्व

  • घाटांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

Kashi Kartik Purnima : धर्म आणि अध्यात्माची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील काशीमध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंगळवारी भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळाला. पहाटेच्या पहिल्या किरणासोबतच गंगेच्या धनुष्याकृती घाटांवर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. 'हर हर महादेव' आणि 'हर हर गंगे'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

सकाळच्या कडकडत्या थंडीची पर्वा न करता देशाच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी गंगेत पवित्र स्नान केले. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.

मध्यरात्रीपासूनच घाटांवर गर्दी

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गंगास्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी ओघ मध्यरात्रीपासूनच सुरू झाली होती. सकाळ होताच प्रमुख घाटांवर गर्दी वाढत गेल्याचे चित्र होते. गंगास्नानानंतर भाविकांनी धार्मिक विधी केले आणि आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दानधर्म करण्यात आले.

कार्तिक पौर्णिमेसोबतच महिनाभर चालणाऱ्या कार्तिक स्नानाचीही यावेळी सांगता झाली. गंगास्नान आणि दानधर्म केल्यानंतर भाविकांनी बाबा विश्वनाथ, बाबा कालभैरव आणि माता अन्नपूर्णा मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. प्रमुख मंदिरांमध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

आवळा, अन्न आणि उबदार कपड्यांच्या दानाला महत्त्व

ज्योतिषाचार्य पंडित श्रीराम शर्मा यांनी कार्तिक पौर्णिमेच्या धार्मिक महत्त्वाबाबत माहिती दिली. या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर देवासमोर धूप-दीप अर्पण करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार आवळा, अन्नधान्य, उबदार कपडे आणि दक्षिणा यांचे दान करणे विशेष फलदायी मानले जाते. त्यामुळे भाविकांनी आपल्या श्रद्धेनुसार गरजूंना दान केले.

घाटांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून घाट आणि शहरातील प्रमुख मार्गांवर सुरक्षा तसेच वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले होते. प्रमुख घाटांवर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जल पोलिसांच्या पथकांकडून गंगेत सतत देखरेख ठेवण्यात येत होती. तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) जवानही विविध ठिकाणी तैनात होते.

भाविकांना खोल पाण्यात जाण्यापासून रोखणे, गर्दीचे नियोजन करणे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क होती. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले.

देव दीपावलीचा नयनरम्य सोहळा संपन्न

छत्तीसगडमधून काशीमध्ये आलेल्या सुधा झा यांनी प्रशासनाच्या व्यवस्थेचे कौतुक केले. योगी सरकारने सनातन संस्कृतीला उंचीवर नेण्याचे काम केले आहे, असे त्या म्हणाल्या. प्रशासनाच्या चांगल्या नियोजनामुळे गंगास्नान आणि बाबा विश्वनाथांचे दर्शन सुरक्षितपणे घेता आले. तसेच संध्याकाळी देव दीपावलीचा नयनरम्य सोहळाही पाहता आल्याने त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातील विद्यार्थी शिवम चौबे यांनीही कार्तिक पौर्णिमेला काशीमध्ये गंगास्नान आणि दानधर्माला विशेष धार्मिक महत्त्व असल्याचे सांगितले. सकाळपासूनच विविध घाटांवर मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. लाखो भाविकांनी गंगेत श्रद्धेनं डुबकी घेतल्याचे सांगितले.