

सुनयना सोनवणे/Republic Day 2027: नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन २०२७ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेट्सची तयारी सुरू असली, तरी राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने तयारीत अडथळे येत आहेत. संचलनासाठी महाराष्ट्र संचालनालयाने सुमारे (Pune) १ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यापैकी सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. निधीअभावी कॅडेट्सचे गणवेश, बूट, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे पोशाख, सादरीकरणाचे साहित्य आणि अन्य आवश्यक वस्तूंची खरेदी रखडली आहे.
महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रजासत्ताक दिन संचलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी पुणे ग्रुपमधील कॅडेट्सच्या प्रशिक्षणाची पाहणी केली. निधीचा प्रस्ताव वेळेत पाठविण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारच्या काटकसरीच्या धोरणानुसार प्रस्तावित रकमेत कपात करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार चार लाख रुपयांची कपातही करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या बैठकीत निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे त्यागी यांनी सांगितले.
कॅडेट्सचे गणवेश तयार करणे, सादरीकरणासाठी मार्गदर्शक नेमणे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साहित्य व वेशभूषा तयार करणे, तसेच कॅडेट्सच्या प्रवासाची तिकिटे काढणे अशा विविध कामांसाठी निधीची आवश्यकता असते. निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने या कामांमध्ये गैरसोय होत असून, त्याचा तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. निधीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांची भेट घेणार असल्याचेही त्यागी यांनी स्पष्ट केले.
यंदा राज्यातील १२८ निवडक कॅडेट्स राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत महाराष्ट्राला अपेक्षित अव्वल स्थान मिळवता आले नसले, तरी यंदा सांघिक प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कॅडेट्सचा व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य, सामान्य ज्ञान, आत्मविश्वास, शिस्त, सांघिक भावना आणि संचलनातील अचूकता यांवर भर दिला जात आहे. पुणे ग्रुपच्या प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करत महाराष्ट्राचे कॅडेट्स यंदा चांगली कामगिरी करतील, असा विश्वास त्यागी यांनी व्यक्त केला.
देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
महाराष्ट्रातील मुलींच्या कॅडेट्सनी सलग तीन वर्षे अखिल भारतीय स्तरावरील ‘सर्वोत्तम मुलगी कॅडेट’ हा किताब पटकावला आहे. यंदाही राज्यातील नऊ मुलींची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलींमध्ये सशस्त्र दल आणि नागरी सेवांमध्ये जाण्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा असून, त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द कौतुकास्पद असल्याचे त्यागी यांनी नमूद केले.
प्रजासत्ताक दिन संचलन २०२७ साठी महाराष्ट्राने किती निधीची मागणी केली आहे?
नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन २०२७ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सच्या तयारीसाठी महाराष्ट्र संचालनालयाने सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
प्रजासत्ताक दिन संचलन २०२७ च्या तयारीत एनसीसी कॅडेट्सना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे?
राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने एनसीसी कॅडेट्सच्या तयारीत अडथळे येत आहेत.