फोटो सौजन्य: YouTube
भारतीय रेल्वे लाखो रेल्वे प्रवाशांना आणखी एक भेट देणार आहे. भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन चालवणार आहे. त्याची सुरुवातही ऑगस्टपासून होणार आहे. बेंगळुरूस्थित बीईएमएल (BEML) कंपनी या वर्षाच्या अखेरीस दहा नवीन स्लीपर वंदे भारत गाड्यांचे रेक वितरीत करणार आहे. आगामी काळात भारतीय रेल्वेकडे स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची कमतरता भासणार नाही. तसेच लवकरात लवकर अनेक मार्गांवर ट्रेन सुरू करता येतील.
वंदे भारत ट्रेनचे सर्व स्लीपर कोच एसी व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. सध्या धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन या चेअर कार आहेत, ज्यामध्ये बसून प्रवास करता येतो. एका मासिकाच्या मते, बीईएमएलला गेल्या वर्षी 675 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती, ज्यामध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी रेक तयार करायचे होते. सुरुवातीला स्लीपर गाड्या मार्चमध्येच सुरू होणार होत्या, पण आधी सार्वत्रिक निवडणुका आणि नंतर इतर काही तांत्रिक कारणांमुळे काहीशा विलंब झाला.
अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील स्पष्ट केले होते की स्लीपर वंदे भारत ट्रेन ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुरू होतील. इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून अनेक वस्तूंचा पुरवठा सुरू झाला असून आता रेल्वे सुरक्षा आयोगाकडून त्याची तपासणी करावी लागणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला आशा आहे की हे दोन महिन्यांत पूर्ण होईल आणि त्यानंतर सप्टेंबरपासून आम्ही 9 रॅक वितरित करण्यास सुरुवात करू. डिसेंबरपर्यंत सर्व काही पूर्ण होणे अपेक्षित आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या एका रेकमध्ये 16 डबे असतील. यात 11 एसी श्री टियर, चार सेकंड एसी आणि एक फर्स्ट एसी कोच असेल. भारतीय रेल्वेने 2029 पर्यंत देशभरात 250 स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. येत्या काळात वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन सतत लाँच होताना पाहायला मिळेल.