capt amarinder singh
नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Captain Amarinder Singh) हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार (Vice Presidential Election ) असण्याची शक्यता आहे. कॅप्टन यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस (Party Merger With BJP) भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी केल्यानंतर ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कॅप्टन यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाच्या विलीनीकरणामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, असे बोलले जात आहे.
कॅप्टन सध्या लंडनमध्ये उपचारासाठी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ते पंजाबला परतणार आहेत. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ ११ ऑगस्ट रोजी संपत आहे. याआधी ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ५ जुलै रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर १९ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरली जाणार आहेत.
कॅप्टनच्या मदतीने भाजप पंजाबमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषत: शीख समाजाशी जवळीक वाढवण्यासाठी भाजप प्रत्येक डाव खेळत आहे. पंतप्रधान मोदी शीख व्यक्तींची भेट घेत आहेत. त्याचवेळी लाल किल्ल्यावर श्री गुरु तेग बहादूरजींचा प्रकाश उत्सवही साजरा करण्यात आला.
कॅप्टन हे पंजाबचे राजकीय दिग्गज आहेत. शहरांपासून खेड्यापर्यंत सर्वत्र ते नावाजलेले नेते आहेत. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कॅप्टनच्या मदतीने भाजपचा पंजाबमध्ये १३ जागांवर डोळा आहे. कृषी सुधारणा कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शीख भाजपवर नाराज आहेत.