कानपूर (Kanpur Violence)मधील परेड स्क्वेअर येथे झालेल्या हिंसाचाराचा तपास करणाऱ्या एटीएस (ATS)च्या अधिकाऱ्यांना या घटनेतील मुख्य आरोपी हयात जफर हाश्मीशी संबंधित खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार (Money Transaction) झाल्याचे आढळून आले. गेल्या तीन वर्षांत चार वेगवेगळ्या खात्यांमधून सुमारे ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा स्थानिक पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, याप्रकरणी कोणीही अधिकारी उघडपणे बोलायला तयार नाही.
हयात जफर हाश्मीने आपल्या संस्थेच्या नावाने सर्व खाती उघडली होती. यामध्ये पोलीस आणि एटीएसच्या पथकाला बाबुपुरवा येथील खासगी बँकेत एक, कर्नलगंज आणि बेकनगंज येथे प्रत्येकी एक खाते आणि पंजाब नॅशनल बँकेत एक खाते उघडल्याचे आढळले. खात्यात एवढी मोठी रक्कम आली कुठून, कुठे खर्च झाली, याचा तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्त विजय सिंह मीना यांनी सांगितले की, एटीएस आणि स्थानिक पोलीस अधिकारी हयात जफर हाश्मीचा मोबाइल, बँक खाते आणि इतर चौकशी करत आहेत. प्रत्येक मुद्दा गांभीर्याने घेतला जात आहे.
नमाजच्या दिवशी फौजफाटा तैनात करणार
परेड चौकाच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी हिंसाचार झाला, तेथे आता पीएसीच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. त्याचवेळी, शांतता कायम राखण्यासाठी शुक्रवारी नमाजच्या दिवशी फौजफाटा तैनात केला जाईल. तसेच, पोलीस सर्वांना सहकार्य करतील. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त विजयसिंह मीना यांनी दिली.