यशवंतरावांच्या भूमिकेचा ‘अजातशत्रू’ नेता; सुप्रिया सुळेंच्या नितीनजी गडकरींना हटके शुभेच्छा

गडकरीसाहेब खूप कुटुंबवत्सल आहेत. पारंपरिक भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या वारशाला पुढे नेणारे त्यांचे कुटुंब आहे. आपण केवळ नेते नाहीत तर पालक आहोत हा भाव त्यांच्या ठायी नेहमी असतो. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असतात व ते नाते ते कसोशीने निभावतात. त्यांच्या घरच्या सोहळ्यात सर्वपक्षीय नेतेमंडळींना आवर्जून आमंत्रण असते आणि ते त्यांच्या प्रेमापोटी येतात देखील. महाराष्ट्राच्या राजकारणाची जी एक एकोप्याची संस्कृती आहे त्याचे ते मनापासून पालन करतात. आमचे त्यांचे राजकीय वाद-विरोध आहेतच. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही तो होता. पण पवार–ठाकरे-गडकरी यांच्या शत्रुत्व कधीच आले नाही.
‘Ajatashatru’ leader of Yashwantrao’s role; Best wishes to Supriya Sule's Nitin Gadkari
Published on: 
Updated on: 

नागपुरातील एक उदाहरण द्यायचे तर दिवंगत कविवर्य सुरेश भट हे अतिशय पुरोगामी विचारांचे होते. संघ परिवाराच्या विचार व कृतींबाबत त्यांनी नेहमीच सडेतोड टीका केली आहे. मात्र आज त्याच नागपूर शहरात कविवर्य सुरेश भटांच्या नावाने एक अतिशय उत्तम सभागृह गडकरी यांनी बांधले आहे. कारण कलावंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना पूर्णपणे मान्य आहे आणि विरोधकांच्या कर्तबगारीला, सर्जनशीलतेला, दाद देण्याचा मनाचा मोठेपणा त्यांच्यात भरपूर आहे. अफाट कार्यक्षमता असणारा, कार्यकर्त्यांचे मोहोळ सोबत असूनही सदैव नेत्याच्या नाहीतर पालकत्वाच्या भूमिकेत असणारा हा नेता त्यामुळेच लोकांना भावतो.

देशाच्या राजकीय क्षेत्रात जी काही नावे आश्वासक वाटतात, त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव खूप वरच्या स्थानी आहे. त्यांचे नाव उच्चारताच आपल्या नजरेसमोर एक दिलखुलास, मनमोकळे असे एक हसरे व्यक्तिमत्व येते. बोलणेही तसेच नेहमीच मोकळे-ढाकळे पाहायला मिळते. त्यांच्या या सगळ्या वागण्या-बोलण्याला खास असा वैदर्भीय टच आहे. नितीनजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. रा. स्व. संघाचे मुख्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरचे खासदार आहेत. पण त्यांच्या वाड्यावर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा राबता असतो.

लोकांची कामे करताना त्यांना विचारसरणी, पक्ष अथवा संघटना यांच्या भिंती आडव्या येत नाहीत. ते रा. स्व. संघ परिवारातील आहेत. पण या परिवारात ते सगळयांत ‘वेगळे’ आहेत. ते अनेकांचे विरोधक असतात. मात्र, शत्रू कधीच कोणाचेच नसतात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाच्या विजयादशमी संचलनात ते आवर्जून सहभागी देखील होतात. किंबहुना आपण एका विशिष्ट विचारसरणीशी जोडले गेलो आहोत हे त्यांनी कधी लपविले नाही. पण त्याचा उगाचच फार गवगवाही केला नाही.

गेली अनेक वर्षे आम्ही संसदेतील सहकारी आहोत. संसदेच्या कामात व्यग्र असताना सुपारी, चॉकलेट खाणे सारख्या विरंगुळ्याच्या गोष्टी त्यांच्याच नाहीतर अनेकांच्या सुरू असतात. असेच एकदा खूप वेळ लोकसभेचे कामकाज सुरू होते. सगळेच थकलेले, कंटाळलेले वाटत होते. गडकरीसाहेबांनी माझ्याकडे पाहिले आणि मला जाणवले की त्यांना सुपारी वगैरे काहीतरी हवंय. मी त्यांना माझ्याकडची सुपारीची डबी पाठविली. ती डबी आवडल्याचे त्यांनी मला सांगितल्यावर मी ती डबी त्यांना भेट दिली. त्यानंतर जेव्हा आम्ही संसदेत अथवा परिसरात भेटतो तेव्हा ‘ हाय-हॅलो’ नव्हे तर गडकरी साहेब गंमतीने ती डबी दाखवितात!

गडकरीसाहेब खूप कुटुंबवत्सल आहेत. पारंपरिक भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या वारशाला पुढे नेणारे त्यांचे कुटुंब आहे. आपण केवळ नेते नाहीत तर पालक आहोत हा भाव त्यांच्या ठायी नेहमी असतो. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असतात व ते नाते ते कसोशीने निभावतात. त्यांच्या घरच्या सोहळ्यात सर्वपक्षीय नेतेमंडळींना आवर्जून आमंत्रण असते आणि ते त्यांच्या प्रेमापोटी येतात देखील. महाराष्ट्राच्या राजकारणाची जी एक एकोप्याची संस्कृती आहे त्याचे ते मनापासून पालन करतात. आमचे त्यांचे राजकीय वाद-विरोध आहेतच. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही तो होता. पण पवार–ठाकरे-गडकरी यांच्या शत्रुत्व कधीच आले नाही.

गडकरीसाहेब सर्वपक्षीय खासदारांची त्यांच्याकडील खात्यांची कामे कोणतेही राजकारण आडवे न आणता करीत असतात. त्यांना सांगितलेली कामे ते बारकाईने लक्षात ठेवतात. त्यामुळे सध्याच्या सरकारमधील गडकरीसाहेब लोकप्रिय मंत्री ठरतात. ते नेहमीच कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याच्या मानसिकतेत असतात. त्यामुळे ते कोणत्याही टिममधील उत्तम खेळाडू ठरतात. परिस्थितीला ते प्रतिक्रिया देत नाहीत तर प्रतिसाद देतात. पातळी सोडून कधीही वक्तव्य करीत नाहीत आणि चांगल्या कामाची स्तुती करताना कधीही कंजुषी करीत नाहीत. यावर्षी अतिशय अडचणीच्या काळात राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उत्तमरीतीने मांडला, याबद्दल गडकरीसाहेबांनी जाहीरपणे दादाचे कौतुक केले. समाजात चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर प्रत्येक वेळी फायद्या-तोट्याची गणिते करायची नसतात, अशीच त्यांची ठाम धारणा आहे.

मी त्यांना नेहमी पुणे ते सातारा महामार्गाच्या कामाबद्दल सांगत असते. तर त्यांच्या सर्व बाबी नीट लक्षात असतात. त्याबद्दल ते नेमके पण सविस्तर सांगतात. राहिलेले कबूलही करतात. तातडीने अधिकाऱ्यांची बैठक लावून दुरुस्तही करतात. त्यांना मी एकदा लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान याच रस्त्यावरून प्रश्न विचारला.या रस्त्याचे काम बरेच दिवसांपासून अडल्याच्या तक्रारी होत्या. थेट त्यांच्या खात्याशी आणि राज्याशी संबंधित हा विषय असल्यामुळे ते याला कशाप्रकारे प्रतिसाद देतील याची मला उत्सुकता होती.माझा प्रश्न संपताच ते उत्तर देण्यासाठी उभे राहिले आणि अतिशय मुद्देसुदपणे त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले. आपल्या खात्याकडून काही त्रुटी राहिल्याचे त्यांनी कबूल केले आणि त्यावर काम करण्याचा आदेशही तिथेच त्यांनी दिला. एवढंच नाहीतर माझ्या प्रश्नामध्ये नमूद नसलेल्या प्रश्नावरही त्यांनी तिथेच तोडगा देखील काढून दिला.

सध्या कोविड महामारीचा प्रादुर्भाव सुरू आहे.या संदर्भात मध्यंतरी त्यांनी आपल्या पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना उद्देशून एक भाषण केले. या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना केवळ सेवाभाव जोपासत लोकांची कामे करण्याचे आवाहन केले. या भाषणादरम्यान त्यांनी खडे बोल देखील सुनावले. हे देखील त्यांच्या स्वभावाचे वैशीष्ट्य... त्यांनी कोरोनाच्या काळात काम करीत असताना त्यामध्ये राजकारण करू नका, असे थेट आणि स्पष्टपणे सुनावले. त्यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाचा आणि मनाला भिडणारा प्रसंग होता तो त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेले आवाहन... ते म्हणाले की, ‘या कोरोनाच्या काळात स्वतःला आणि कुटुंबियांना जपा.’ हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर कार्यकर्त्यांच्या प्रती असणारी काळजी आणि आपुलकी स्पष्टपणे दिसत होती. कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला ‘आपली घरची माणसं’ मानणारा नेता लोकप्रिय का आहे याचे उत्तर देणारे हे भाषण होते.

राजकारण हे समाजाला दिशा देण्याचे, प्रगती घडविण्याचे एक मुख्य साधन आहे. निवडणुकीचा काळ वगळता विकासाचे कार्य मनापासून सर्वांना बरोबर घेऊन करायला पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेत सदैव वावरले पाहिजे. ही अतिशय महत्वाची बाब असून महाराष्ट्रात अशा प्रकारची व्यापक भूमिका ठेवून कार्यरत असणाऱ्या नेत्यांपैकी एक असणारे नेते म्हणून माननीय नितीन गडकरी यांचा उल्लेख करता येईल. त्यांचे हे वेगळेपण उठून दिसते, म्हणूनच ते राजकीय क्षेत्रांतील अजातशत्रू नेते आहेत.

माननीय नितीन गडकरीसाहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !!!

सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँगेस