मुंबई : भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या आठवणीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आशा भोसले यांनी लतादीदींच्या अनेका आठवणींना उजाळा देताना अश्रू अनावर झाले. या श्रद्धांजली सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पंडीत हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, धनंजय केळकर आदी उपस्थित होते.
लतादीदींविषयी बोलताना आशा भोसले म्हणाले की, लता मंगेशकर ही आमच्यासाठी आमचा बाप होती असं म्हणत लता दीदींनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभारण्याचा निर्णय कसा घेतला याविषयी सांगितलं.
आशा भोसले यावेळी जड अंतकरणांनी बोलताना दिसल्या. त्या म्हटल्या की, “ती फार बुद्धिवान होती. जर ती शिकलेली असती तर आज कुठल्या कुठे असती, पंतप्रधान तीच झाली असती. पुण्यात जेव्हा आमचे वडील गेले. वडीलांना ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही नेलं होतं. जेव्हा आम्हाला बघायला नेलं होतं तेव्हा त्यांना चटईमध्ये गुंडाळून टॅक्सीमध्ये घालून आणलं होतं. आम्हाला कळत नव्हत त्यावेळेला आम्ही लहान होतो. पण दीदीचं वय होतं ती 12 वर्षांची होती. तिने हे लक्षात ठेवलं. तिने खूप कष्ट सहन केलय. सगळा त्रास सहन केलाय. त्यानंतर वडीलांची गोष्ट लक्षात ठेवून त्याच पुण्यात हॉस्पिटल करायचं ठरवलं. ही तिची जिद्द होती की माझ्या वडिलांना तरटामध्ये बांधून आणलं. तर मी हॉस्पिटल बनवणार आणि गरीबांसाठी बनवणार. त्या हॉस्पिटलला लता मंगेशकर नाव देऊ शकली असती ती. पण तिने दिनानाथ मंगेशकर असं नाव दिलं. तिला मंगेशकर नावाचा फार अभिमान होता.”