

देशाच्या जडणघडणीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सहकारी म्हणून ज्या मराठी माणसाचे नाव कायम इतिहासात कोरले जाईल, ते नाव नितीनजींचे असेल, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. नेता कितीही मोठा झाला तरी त्याचे मातीशी नाते कायम राहायला हवे. जो हे नाते ठेवतो, तो पुढे यशस्वी होतो. नितीनजी या मापदंडातही अगदी काटेकोर आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी महाल, नागपूर आणि विदर्भाला ते विसरत नाहीत. मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नागपुरात आले होते. परत जाताना बहुतेक सारे मंत्री त्यांच्यासोबत परत गेले. पण, नितीनजी थांबले. मोदीजी त्यांना म्हणालेही, ‘आप तो रूकेंगे.’ तुम्ही केंद्रात मंत्री आहात मग दर आठवड्याला नागपूरला का जाता, असे मोदीजी त्यांना कधी कधी गंमतीने म्हणतात देखील ! हे त्यांचे नाते आहे नागपूरच्या मातीशी !
1) नितीनजी ही व्यक्ती नसून एक विद्यापीठ आहे. चाकोरीबद्ध विचार करणे त्यांना जमतच नाही. ‘आऊट ऑफ द बॉक्स’ जाऊन विचार करायचा आणि यश मिळवायचे, यात ते माहीर आहेत. आपल्या या चालत्या-बोलत्या विद्यापीठाचे नियम वगैरे त्यांनीच बनवले आहेत. त्यांची आणखी एक गोष्ट जी मलाच काय अनेकांना भावतेे. ती म्हणजे त्यांचा मोकळा-ढाकळा स्वभाव!
2) पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आहे, तसे नितीनजींचे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात श्रेष्ठत्त्व आहे. राजकारणात मी माझी स्वत:ची जागा निर्माण केली असली तरी त्यांची जागा कायम आहे. मी त्यांच्या भूमिकांना जितकी किंमत देतो, प्राधान्य देतो, तितकीच किंमत आणि प्राधान्य ते माझ्याही भूमिकांना देतात.
3) देशाच्या जडणघडणीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सहकारी म्हणून ज्या मराठी माणसाचे नाव कायम इतिहासात कोरले जाईल, ते नाव नितीनजींचे असेल. याबाबत कोणतीही शंका नाही. नेता कितीही मोठा झाला तरी त्याचे मातीशी नाते कायम राहायला हवे. जो हे नाते ठेवतो, तो नितीनजी प्रमाणे यशस्वी होईल.
4) नितीन गडकरी हे प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. गतीमानता हा त्यांचा सर्वात मोठा गुण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश अतिशय वेगाने प्रगती करताना नितीनजी यांची गतिमानता ही या विकासप्रक्रियेला सहाय्यक भूमिका प्रदान करत आहे. त्यामुळे आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते.
5) संघाच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणात आल्यानंतर अफाट उत्साह, विकासाचा ध्यास, कामाची आक्रमक शैली, विज्ञानाचे प्रचंड आकर्षण या गुणांमुळे सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेले नितीनजी आज राजकारणात यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नितीनजी गडकरी हे २७ मे २०२१ रोजी वयाची ६४ वर्षे पूर्ण करीत आहेत, यावर विश्वासच बसत नाही. एखाद्या विशीतल्या तरुणापेक्षाही अधिक उत्साहाने ते आताही काम करीत असतील, तर विश्वास तरी कसा बसणार? कामाचा विलक्षण झपाटा आणि त्यासाठी आवश्यक असलेला अफाट उत्साह, सतत काहीतरी नवनवीन कल्पना मांडत राहणे हे त्यांचे सुरूच असते.
मनात आलेली कल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र धडपड करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. नागपूरसारख्या भागातून संघाच्या माध्यमातून समाजकारण आणि पुढे राजकारणात आलेल्या नितीन गडकरी यांनी अफाट उत्साह, विकासाचा ध्यास, काम करण्याची आक्रमक शैली, विज्ञानाचे प्रचंड आकर्षण आणि प्रयोगशील वृत्ती या गुणांमुळे सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेले नितीनजी आज राजकारणात यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. निर्भिड स्वभावामुळे कोणत्याही अडचणी आल्या तरी पुढे जात राहणे हेच त्यांच्या यशाचे गमक आहे, असेही मी आवर्जून म्हणेन. आपल्या कल्पना मांडणारे अनेक जण आहेत. मात्र आपली कल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी झटणारे आणि ती पूर्णत्वास आणणारे खूप कमी लोक आहेत. नितीनजी त्यापैकीच एक!
अडचणीवर मात करण्याचा त्यांचा स्वभावच आहे. मला आठवते, त्यांना काही वर्षांपूर्वी मोठा अपघात झाला होता. त्यातून ते सुदैवाने बचावले, मात्र पायाला दुखापत झाली होती. तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. नीट चालताही येत नसताना त्यांनी आपले काम सुरू ठेवले. सरकारवर त्यांची टिकेची धार मात्र तसूभरही कमी झालेली नव्हती. त्यांच्या या कामात सत्ताधारी पक्षाचे लोक सतत अडथळे आणत असत. पण अक्षरशः एका पायावर उभे राहून त्यांनी पक्ष मात्र मजबुतीने उभा केला होता. त्याच काळात झालेल्या नागपुरात महापालिकेच्या निवडणुकांतही भाजपाला एक नंबरचा पक्ष म्हणून त्यांनी विजय मिळवून दिला.
नितीनजी ही व्यक्ती नसून एक विद्यापीठ आहे. चाकोरीबद्ध विचार करणे त्यांना जमतच नाही. ‘आऊट ऑफ द बॉक्स’ जाऊन विचार करायचा आणि यश मिळवायचे, यात ते माहीर आहेत. आपल्या या चालत्या-बोलत्या विद्यापीठाचे नियम वगैरे त्यांनीच बनवले आहेत. त्यांची आणखी एक गोष्ट जी मलाच काय अनेकांना भावते, ती म्हणजे त्यांचा मोकळा-ढाकळा स्वभाव. विदर्भातले असल्याने ही देणगी त्यांना लाभली आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व खुले आहे. जे काही करायचे किंवा बोलायचे ते सगळ्यांसमोर. आत-बाहेर असे काहीच नाही. अगदी बिनधास्तपणे जे करायचे तेच बोलायचे किंवा जे बोलायचे तेच करायचे, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. खरंतर राजकारणात इतके मोकळे राहण्याची पद्धत नाही. राजकीय निर्णयांचे परिणाम असतात. त्यामुळे अनेक जण हिशोबी असतात. नितीनजी त्याला अपवाद आहेत. एखादी गोष्ट करायची म्हटली, की कितीही विरोध झाला, तरी त्याची तमा न बाळगता ते ती करतातच. जे बोलतो ते करून दाखवणारा नितीनजी हा आगळा नेता आहे.
आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील, याचा ते कधीच विचार करीत नाहीत. त्यांना विरोधकांनी त्यावरून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण, आत्मविश्वासाच्या जोरावर ते कायम पुढे जात राहिले आणि यशस्वीही होत गेले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना तर त्यांना अडचणीत आणण्याचा विरोधकांकडून अनेकदा प्रयत्न झाला. त्यांच्यावर बेछूट आरोप झाले. त्यातून नितीनजी सावरणार नाहीत, आता राजकीय अस्ताकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे, असे भाकीतही काही जणांनी करून टाकले. मात्र त्यांना जवळून ओळखणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ते यातूनही बाहेर पडतील, अशी खात्री होती. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर तसूभरही परिणाम झाला नाही. आपला नेता चुकीचे वागणारच नाही ही खात्री त्यांना होती. नितीनजींनी ही अग्निपरीक्षा देखील पार केली.
आम्ही राजकारणात एकत्र काम करत आहोत. आमचे स्वभाव वेगळे असले, तरी एक समान सूत्रही आहे ते म्हणजे आमच्या दोघांच्याही कामात पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याच्याबाहेर आम्ही कधीही गेलो नाही. प्रत्येक नेत्याचे आपले एक श्रेष्ठत्त्व असते. अटलजींचे जसे एक श्रेष्ठत्त्व आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आहे, तसे नितीनजींचे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात श्रेष्ठत्त्व आहे. राजकारणात मी माझी स्वत:ची जागा निर्माण केली असली तरी त्यांची जागा कायम आहे.
मी त्यांच्या भूमिकांना जितकी किंमत देतो, प्राधान्य देतो, तितकीच किंमत आणि प्राधान्य ते माझ्याही भूमिकांना देतात. काही विषयांवर दोन विचार पुढे येतात पण, अनेकदा मी माझा विषय त्यांच्यापुढे आग्रहाने मांडतो. पण, अंतिम शब्द त्यांचाच असतो. काही वेळा असेही प्रसंग येतात की, त्यांच्या मनाला एखादी भूमिका पटत नाही. पण, ते ती भूमिका माझ्यासाठी मान्य करतात. असे आमचे नैसर्गिक नाते आहे आणि म्हणूनच माझ्यासाठी ते मार्गदर्शक आहेत. निवडणुकांच्या काळात स्वत: जातीने लक्ष घालायचे, प्रत्येकाची काळजी घ्यायची, प्रत्येकाप्रती आत्मियता ठेवायची हा त्यांचा स्थायी भाव आहे. यातून त्यांच्या मनातील हळवेपण सहज अधोरेखित होते.
नितीनजी हे प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. गतीमानता हा त्यांचा सर्वात मोठा गुण. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश अतिशय वेगाने प्रगती करत असताना नितीनजींची गतिमानता ही या विकासप्रक्रियेला सहाय्यक भूमिका प्रदान करते आहे. त्यांच्या कामाची गती पाहिली की, आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. आज त्यांचा विभाग कितीतरी लाख कोटींची कामे देशात करतो आहे, मात्र एकही आरोप त्यांच्या खात्यावर नाही. गतिमानतेसोबत ही पारदर्शिताही अतिशय मोलाची आहे.
मोदीजींसारखा द्रष्टानेता या देशाला किमान १५-२० वर्षे पंतप्रधान म्हणून लाभावा, ही नितीनजींसह आम्हा सर्वांची इच्छा आहे. देशाच्या जडणघडणीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सहकारी म्हणून ज्या मराठी माणसाचे नाव कायम इतिहासात कोरले जाईल, ते नाव नितीनजींचे असेल, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. नेता कितीही मोठा झाला तरी त्याचे मातीशी नाते कायम राहायला हवे. जो हे नाते ठेवतो, तो पुढे यशस्वी होतो. नितीनजी या मापदंडातही अगदी काटेकोर आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी महाल, नागपूर आणि विदर्भाला ते विसरत नाहीत. मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नागपुरात आले होते. परत जाताना बहुतेक सारे मंत्री त्यांच्यासोबत परत गेले. पण, नितीनजी थांबले. मोदीजी त्यांना म्हणालेही, ‘आप तो रूकेंगे.’ तुम्ही केंद्रात मंत्री आहात मग दर आठवड्याला नागपूरला का जाता, असे मोदीजी त्यांना कधीकधी गंमतीने म्हणतात देखील! हे त्यांचे नाते आहे, नागपूरच्या मातीशी! आज राष्ट्रीय स्तरावर अनेक मोठे नेते आहेत, जे आपल्या कामाच्या ओघात आपल्या गावापासून दुरावतात. पण, नितीनजींनी मात्र आपल्या मातीशी आपली नाळ अतिशय मजबुत ठेवली आहे. ज्यांच्यासोबत ते मोठे झाले, त्यांना आपल्या मोठेपणाची सावली देण्यात ते कसर ठेवत नाहीत.
आजही कोरोनाच्या कालखंडात प्रारंभीच्या काळात स्वत: नितीनजी कोरोनाग्रस्त झाले. त्यावर मात करून त्यांनी नागपूर आणि विदर्भासाठी अधिकाधिक सोयी कशा उपलब्ध होतील, याकडे स्वत: लक्ष घातले. रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. निरनिराळ्या औषध कंपन्यांशी ते सातत्याने संपर्कात असतात. वर्ध्यात रेमडेसिवीरचे उत्पादन प्रारंभ केले. निश्चितच या कालखंडात त्यांनी केलेले कार्य आणि आम्हा सर्वांना केलेले मार्गदर्शन उपयुक्त असेच आहे. त्यामुळे नागपुरात अनेक सुविधा आम्ही उभारू शकलो. मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते