सातारा – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ईडी (ED), सीबीआय (CBI)कडून विविध संस्था, व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. कारवाई होत असलेल्या नेत्यांमध्ये राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. सत्ताधारी केंद्रातील भाजवर आरोप करत आहेत तर भाजपचे नेते मविआ सरकारमधील नेत्यांना प्रत्युत्तर देत आहेत. याच दरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी ईडी समोर एक अट ठेवली आहे.
“ईडीने यावं पण कारवाई करणार असाल तरच या अन्यथा येऊ नका. नाहीतर परत यांचा, त्यांचा फोन आला म्हणून सांगतील. तसं असेल तर येऊ नका, येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. नाहीतर उद्या उगाच राजकारण झालं, द्वेषापोटी अशी आरडाओरड होऊ नये,” असं आव्हानच उदयनराजेंनी दिलं आहे. यावेळी त्यांनी ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असं म्हटलं आहे.
याआधी देखील या सर्व घडामोडींवर उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले होते. ईडीने हिंमत असेल तर आपल्याकडे यावे. पुराव्यासकट मी सर्वांची यादी देतो असे आव्हान त्यांनी दिले होते. ‘जसे आपण पेरतो तसेच उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन असे ते म्हणाले. तसेच ईडी कारवाईंच्या मागे भाजप असल्याच्या आरोपांबाबत त्यांनी विचारण्यात आले. यावर उदयनराजे म्हणाले की, ‘कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढत बसायचे. बास झाले आता राजकारण’, असे म्हणत उदयनराजे यांनी ठणकावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आव्हान दिले आहे.