केंद्र सरकारला वेसण कोण घालणार? गोंधळात विधेयके मंजूर; तिसर्‍या आठवड्यातही संसदेचे कामकाज ठप्प

भारतातील संसदीय लोकशाहीपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे सरकार आपल्या निर्णयावर ठाम असते तर दुसरीकडे विरोधक सारखा गोंधळ करीत असतात. परिणामी संसदेच्या कामकाजात गतिरोध निर्माण झालेला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून संसदेचे कामकाज ठप्प झालेले आहे.
Rajya Sabha
Published on: 
Updated on: 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील वेळ अशाप्रकारे वाया जाईल तर याला अखेर जबाबदार कोण राहील? सरकार आणि विरोधक दोघेही जनतेचे प्रतिनिधी आहेत, परंतु संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, जनतेच्या समस्यावर सभागृहात चर्चा व्हावी, त्यांचे प्रश्‍न मार्गी लागावे याचा मात्र उभयतांकडून विचारच केला जात नाही. ज्याप्रकारे उभयतांमध्ये तू-तू, मै-मै असते, हे मात्र आपल्या लोकशाहीला कदापिही सुसंगत नाही.

विरोधकांचे म्हणणे आहे की, मोदी सरकारची भूमिका सामंजस्याची नसतेच. बहुमताच्या जोरावर सरकार विरोधकांची अवहेलना करीत आहे. वाढती महागाई, पेगॅसस हेरगिरी प्रकरण, कृषी ६ कायदे इत्यादी मुद्दयांवर संसदेत चर्चाच होत नाही. सरकार या मुद्दयांवर चर्चा करण्यास तयार नाही. विरोधकांचा सतत गोंधळ सुरू असतो आणि सरकार आपल्या बहुमताच्या जोरावर विधेयके चर्चेविनाच तातडीने मंजूर करून घेत आहेत.

विरोधकसुद्धा संसदेत चर्चा करण्याऐवजी सातत्याने गोंधळ घालतात. हे कोणते राजकारण आहे ? यातून काय साध्य होणार आहे ? जनतेच्या ज्वलंत प्रश्‍नावर विरोधकांनी आपले म्हणणे योग्य पद्धतीने सभागृहात मांडले पाहिजे. सरकारनेसुद्धा त्यांच्या प्रश्‍नांवर योग्य उत्तरे देऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. संसदीय लोकशाही व्यवस्थेत तर्कसंगत भूमिका घेणे महत्त्वाचे असते. हेसुद्धा तेवढेच खरे आहे की, सरकारसुद्धा संसदीय परंपराचे पालन करण्यास गंभीर नाही.

महत्त्वाची विधेयके संसदेच्या प्रवर समितीकडे पाठविण्याची जी परंपरा होती ती आता पूर्णपणे संपलेलीच दिसते. सरकारची एकाधिकार प्रवृती वाढू लागली आहे. केंद्र सरकारने ३ कृषी कायदे तर केले परंतु त्यावर कोणतीही चर्चा न करता तातडीने मंजूर करून घेतले आहेत. पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे असे विरोधकांचे म्हणणे आहे, परंतु सरकार मात्र यावर चर्चा करण्यास तयार नाही, याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र विरोधकावर स्वार्थी राजकारण करीत असल्याचा आरोप करून देशाचा विकास रोखण्याचा विरोधक प्रयत्न करीत आहे, असे सांगत आहेत.

विरोधकांकडून संसदेचा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे, असाही आरोप पंतप्रधानांनी केलेला आहे. दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून संसदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे देशाचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे, असे म्हटले आहे.

central government Passed bills in confusion Parliament adjourned for third week