uddhav thakre
मुंबई : राज्य शासनाच्या(State Government) महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत(mahatma Phule Medical Scheme) म्युकरमायकोसीसच्या (mucormycosis रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजूरी दिली. दरनिश्चिती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.
अधिसूचना ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू
खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील.
भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करणार
संबंधित रुग्णालयाने रुग्णाला पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर
विशेष म्हणजे म्युकरमायकोसीस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.