कोल्हापूर : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून, राष्ट्रीय राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सध्या पाऊस उघडला असल्याने राष्ट्रीय राज्यमार्ग सुरु झाल्यानंतर या वाहनांकडून टोल प्लाझावर तीन ते चार दिवस टोल आकारू नये, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीच्या निवेदनाव्दारे केली आहे.
खासदार मंडलिक यांनी केलेल्या मागणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महापूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, शहराच्या दोन्ही बाजूस राष्ट्रीय राज्य महामार्गावर वाहनांच्या दोन-तीन दिवसांपासून लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. यामध्ये नाशवंत माल, औषधे, धान्य, भाजी-पाला आदी अत्यावश्यक सेवेतील माल असून, या मालाची कोल्हापूर जिल्ह्यास तातडीने आवश्यकता आहे. पावसाचे पाणी ओसरल्यावर राष्ट्रीय राज्यमहामार्गावरुन वाहतूक सुरु झाल्यानंतर या वाहनांकडून टोल वसूल केल्यास ट्रॅफिक जाम होऊन गोंधळ उडण्याची भीती आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांकडून तीन ते चार दिवस टोल आकारु असे म्हटले आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेऊन संसदेचे अधिवेशन निम्यात सोडून खासदार मंडलिक काल कोल्हापूरात दाखल झाले. आज त्यांनी पूरग्रस्त ठिकाणी भेटी देऊन स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची व जेवणासंदर्भात विचारपूस केली. यावेळी सदाशिवराव मंडलिक फौंडेशन व आयोध्या फौंडेशन यांच्या सामाजिक बांधिलकीतून सुरु असलेल्या सेंट्रल किचनमधून दररोज सुमारे साडेपाचशे पूरग्रस्तांना जेवण देत असल्याची माहितीही खासदार मंडलिक यांनी यावेळी दिली.