देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता म्युकरमायकोसिस आणि काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. मुंबईत तीन मुलांना आपले डोळे गमावण्याची वेळ आलीय. या मुलांवर उपचार करताना नाईलाजानं डोळे काढावे लागल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. डोळे काढले नसते, तर या मुलांच्या जीवावर बेतलं असतं. त्यामुळं जीव वाचवण्यासाठी नाईलाज म्हणून त्यांचे डोळे काढावे लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
ही तीन मुलं मुंबईतील दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल होती. ४, ६ आणि १४ वर्षं वय असणाऱ्या मुलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः मधुमेह असणाऱ्या रुग्णांना काळ्या बुरशीचा सर्वाधिक धोका असतो. मात्र तीन मुलांपैकी ४ आणि ६ वर्षाच्या मुलांना मधुमेह नव्हता, तरीही त्यांना आपले डोळे गमावावे लागले. याशिवाय एका १६ वर्षांच्या मुलीच्या पोटात काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचंही आढळून आलंय. कोरोनातून बरी झाल्यानंतर काळ्या बुरशीचा हल्ला तिच्यावर झाला.
डोळे काढावे लागलेल्या मुलांवर साधारण ५ ते ६ आठवडे उपचार सुरु होते. मात्र हळूहळू काळी बुरशी त्यांच्या डोळ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर मेंदूपर्यंत ती पोहोचून जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्याचे डोळे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. [read_also content=”कोकच्या बाटल्या काढून रोनाल्डोने एक मोठा संदेश दिला, परंतु भारतीय सेलिब्रिटी केवळ कोलामधूनच नव्हे तर गुटख्यासारख्या ब्रँडमधूनही रग्गड पैसे कमावतात https://www.navarashtra.com/latest-news/ronaldo-gave-a-big-message-by-removing-coke-bottles-but-indian-stars-earn-huge-amount-not-only-from-cola-but-also-from-gutkha-brands-know-the-full-story-nrvb-143893.html”]
मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमधील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. जेसल सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार मधुमेह असणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीची प्रकृती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर ४८ तासांतच बिघडायला सुरुवात झाली. तिचे डोळे काळे पडले. फंगस नाकापर्यंत पोहोचलं. सहा आठवडे त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळं आम्हाला तिचे डोळे काढावे लागले.