दिल्ली : आपचे प्रमुख नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी केजरीवाल यांना झालेली ही अटक विरोधकांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, देशाभरातील विरोधकांनी स्थापन केलेली इंडिया आघाडी अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभी आहे. आपले शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज उठवण्यासाठी रविवार, ३१ मार्च २०२४ रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीने राजधानी दिल्लीमधील रामलीला मैदानात महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षाचे नेते या रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे.
दिल्लीमध्ये रविवारी इंडिया आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाही करत आहेत. त्यामुळे ३१ तारखेला सकाळी १० वाजता रामलीला मैदानात महारॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. अशी घोषणा करण्यात आली. गोपाल राय पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप लावले जात आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यालयाला पोलिस छावणीचं स्वरुप दिलं गेलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आरोपीसारखी वागणूक दिली जात आहे. काँग्रेस पक्षाचं अकाऊंट सील केलं आहे, त्यामुळे प्रचारात अडथळा येत आहे. हे लोक दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करु शकतात, तर काहीही करु शकतात. असे मत गोपाल राय यांनी मांडले.
पत्रकार परिषदेत दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अरविंदर सिंह लवली यांनी सांगितलं की, विरोधी पक्षांना समान संधी दिली जात नाही. काँग्रेसच्या खात्यावर बंधनं आणली आहेत, मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. त्यामुळे ३१ मार्च रोजी महारॅली आयोजित केली आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र यावं लागेल, असं ते म्हणाले.