ही गोष्ट आहे दोन तरुणांची. एक बिहारचा आणि एका राजस्थानचा. सुमारे १५ वर्षांपूर्वी एकाच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेले हे दोन तरुण एकमेकांचे मित्र झाले. बिहारमधून आलेला अमृतांश कुमार आणि राजस्थानचा कपीश सराफ यांनी एकत्रित इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर एकत्रच एमबीएदेखील केलं. त्यानंतर दोघांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. १० वर्षं त्यांनी नोकरी केली आणि त्यानंतर आयुष्य बदलून टाकणारा एक निर्णय घेतला.
या दोघांनी नोकरी सोडून एक स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतला. शालेय मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीशी जोडणारा प्रयोग त्यांनी सुरु केला. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्यांना आपली संकल्पना समजावून सांगितली. गेले वर्षभर केलेले प्रयत्न आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणा यांच्या जोरावर या प्रयोगाला भन्नाट यश मिळालं. एका वर्षात १ हजार शाळा या प्रयोगात सहभागी झाल्या, तर आतापर्यंत या कंपनीनं ३० कोटींचा व्यवहार केलाय.
अशी आहे संकल्पना
प्रत्येक मुलामध्ये काही ना काही नैसर्गिक टॅलेंट असतं. मात्र आपल्याकडे मुलाला नेहमीचं शिक्षण, त्याच त्याच मार्गाने होणारी प्रगती आणि नोकरी यापलिकडं पाहताच येत नाही. अनेकदा लहान वयात पालक मुलांवर आपली आवडनिवड लादतात. त्यामुळे मुलांचं नैसर्गिक कल कुठे आहे आणि त्याला अधिक गती कशात आहे, हे समजत नाही. यासाठी प्रत्येक मुलाचं नैसर्गिक टॅलेंट शोधून त्यावर काम करणारी यंत्रणा या दोघांनी तयार केलीय.[read_also content=”कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांच्या शरीरात तयार होणाऱ्या अॅंटीबॉडी टिकतात इतक्या दिवस https://www.navarashtra.com/latest-news/the-antibodies-produced-in-the-body-of-a-corona-free-citizen-last-as-long-nrpd-143310.html”]
सहा ते बारा वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील सर्व संधी यात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे नेमक्या कुठल्या गोष्टीत मूल अधिक रमतंय, ते समजतं. तो धागा पकडून मुलाला त्या गोष्टी अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात येतात.