anupam kher the kashmir files
मुंबई, ९० च्या दशकात काश्मिर येथील काश्मीर पंडिताच्या जीवनातील संघर्षावर आधारित असलेल्या ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपटाविरोधातील याचिका मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे झी स्टुडिओजला मोठा दिलासा मिळाला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
१९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावरील सत्य घटनांवर ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. त्यावर आक्षेप घेत उत्तर प्रदेशचे रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून सदर चित्रपट मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांच्या केलेल्या हत्येवर आधारित आहे. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण चित्रपटात त्या काळात घडलेल्या घटनांवर एकतर्फी भाष्य करण्यात आले आहे. ज्यामुळे हिंदू समुदायाची माथी भडकू शकतात आणि देशभरात हिंसाचार घडू शकतो. सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका आणि निकाल जाहीर होण्याचे दिवस आहेत. राजकीय पक्षांकडून या मुद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वत्र जातीय हिंसाचारात वाढू शकते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची तसेच याचिकेवर सुनावणी होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर त्वरित काढून टाकावा, अशी विनंती याचिकाकर्त्याकडून करण्यात आली.
त्यावर मंगळवारी मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, सेन्सॉर बोर्डने चित्रपटाला दिलेल्या प्रमाणपत्राला याचिकेत आव्हान देण्यात आले नसल्याचे खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आधीच्या अशाच एका खटल्यादरम्यान, याचिकाकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डने चित्रपटाला दिलेल्या प्रमाणपत्राला याचिकेत आव्हान दिले नव्हते. त्यामुळे त्यांची याचिकाही फेटाळून लावण्यात आल्याचे न्या. दत्ता यांनी स्पष्ट करत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांच्या मागणीसह याचिकाही फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट ठरलेल्या वेळी येत्या ११ मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.