सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास विधान परिषदेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा प्रवक्ता उमेश पाटील यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.
आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी अनेकांची नावे समोर येत असली तरी याबाबत अद्याप उमेदवार ठरविण्यात आला नाही. उमेदवार ठरविण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना आहे. सोशल मीडियातून माझे विधान परिषदेसाठी नाव पुढे येत असल्याचेही उमेश पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषित केल्याप्रमाणे आणि जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. एक महिनाभर हा उपक्रम असणार आहे. २ ऑगस्ट रोजी अक्कलकोट येथील कांतामती विजयसिंह राजेभोसल मंगल कार्यालय सकाळी १० वाजता आणि दुपारी २ वाजता मैंदर्गी, ४ वाजता, दुधनी, ५ वाजता, दुधनी येथून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे निमंत्रक उमेश पाटील यांनी दिली आहे.