

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणावर(national politics) प्रभाव असलेला आणि गेले काही वर्षांपासून विजयी ठरलेला नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांचा अश्वमेध रोखण्यात (Assembly Election 2021)तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना यश आले आहे.
भाजपाने सर्व ताकद मैदानात उतरवून पुकारलेल्या या युद्धात एकट्या ममता बॅनर्जी सगळ्यांना पुरुन उरल्या आहेत. ममतादीदींची सत्ता उलथून टाकण्याचं भाजापाचं स्पप्न धुळीला मिळालं आहे.
या निकालानंतर ममता बॅनर्जी यांची राष्ट्रीय राजकारणातील पत उंचावणार तर आहेच, पण त्याचबरोबर सर्व विरोधकांना आणि प्रादेशिक पक्षांना या निकालामुळे अधिक आत्मविश्वास मिळणार आहे. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुका या सोप्या नाहीत, हा संदेएशही यातून भाजपाला मिळाला आहे. या निकालाचे राष्ट्रीय राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत.
१. बंगाली अस्मितेशी स्वत:ला जोडण्यात ममता दीदींना यश
पश्चिम बंगाल निवडणूक प्रचारात मुस्लिमांचे लांगुलचालन, घुसखोरीला पाठिंबा यासारखे अनेक आरोप ममता सरकारवर करण्यात आले. यानिमित्ताने मतांचे ध्रुवीकरण करता येईल, असा भाजपाचा प्रयत्न होता. यात भाजपाला यश मिळाले असले तरी ममता यांच्या प्रचारातील बंगाली गौरव, बंगाली संस्कृती, अस्मितेचा मुद्दा जास्त चालल्याचे निकालांवरुन स्पष्ट होते आहे.
जर ही निवडणूक तृणमूल हरले, तर सत्ता राज्याबाहेर जाईल आणि बाहेरची मंडळी बंगालचे राज्य चालवतील, हे मतदारांना पटवून देण्यात ममतादीदी यशस्वी ठरल्या आहेत. हिंदीबहुल आणि उ. बंगालमध्ये हा मुद्दा कमी चालला असला तरी द. बंगाल आणि ग्रामीण भागात या अस्मितेच्या मुद्द्याचा ममता दीदी आणि तृणमूलला फायदा झाल्याचे दिसते आहे. याच मुद्द्याच्या आधारावर ममता यांना मोठे बहुमत मिळाले आहे.
२. आता राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणार ममतादीदी
ममतादीदी या पहिल्यापासून मोदी-शाहा या जोडगोळीच्या विरोधात आहे. या दोघांविरोधात सर्व विरोधकांना एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्नही त्यांनी यापूर्वी केला होता. आत्तापर्यंत या एकजुटीचे पुढे काही होऊ शकले नसले, तरी पश्चिम बंगाल निवडणुकांच्या निकालानंतर आता ममता दीदी यांना दिल्लीचे वेध लागण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पातळीवर आपणच आव्हान देऊ शकतो, असा दावा आगामी काळात ममतांकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३. प्रादेशिक पक्षच भाजपाला रोखू शकतात हा संदेश
या निकालांमुळे काँग्रेसची स्थिती अधिक नाजूक झाली आहे. ज्या राज्यात फक्त काँग्रेसशी मुकाबला आहे, तिथेच भाजपाला चांगले यश मिळते, या निष्कर्षावर या निकालांनी शिक्कामोर्तब केले आहे. अर्थात याला उ. प्रदेश अपवाद आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकांसाठी मोदी, शाहा यांनी पूर्ण ताकद लावली होती. मात्र आपला गड राखण्यात ममतादीदींना यश आले आहे. आगामी काळात मोदी-शाहांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. मात्र या विरोधकांचे नेतृत्व प्रादेशिक स्तरावरचे असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस अनेक राज्यांत सहयोगी भूमिकेत राहण्याची शक्यता आहे.
४.ज्योती बसूंप्रमाणे ममतांची प्रतिमा
एका बाजूला भाजपाची विशाल हायटेक प्रचार यंत्रणा आणि दुसरीकडे रस्त्यावरचा संघर्ष करणाऱ्या अशी ओळख असलेल्या एकट्या ममतादीदी, यांच्यात हा संघर्ष झाला. संपूर्ण देशातील भाजपाचे नेते या प्रचारात उतरले होते, तर दुसरीकडे तृणमूल केवळ ममतादीदींच्या लोकप्रियतेच्या सहाऱ्यावर होती.
दहा वर्षांनंतरही ममतांनी मिळवलेला विजय हेच संकेत दोते की त्यांची लोकोप्रियता बंगालमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. एककेळी असलेल्या ज्योती बसू यांच्या लोकप्रियतेनुसारच ममतादीदींची सध्याची लोकप्रियता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही बंगालमध्ये लोकप्रिय आहेत, मात्र ते लोकसभा निवडणुकांसाठी. जेव्हा राज्याचा विचार होतो, तेव्हा ममतदीदींशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.
५. कोरोनावरुन मोदी सरकारवरील टीका वाढेल
कोरोनाच्या काळात झालेल्या निवडणुका, त्यातील लाखोंच्या प्रचारसभा, त्यातून वाढलेले कोरोना रुग्ण, यावरुन मोदी सरकारवर आत्ताच टीका सुरु आहे. या निकालानंतर या मुद्द्यावर विरोधक अधिक आक्रमक टीका करण्याची शक्यता आहे. लसीकरणावरुन केंद्र सरकार आणि भाजपाची सत्ता नसलेली राज्ये यांच्यातील सुरु असलेला तणाव आणखी चिघळण्याची शक्यता आहे. १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरु झाल्यानंतर, लसींच्या साठ्यांवरुन या संघर्षात अधिकच भर पडणार आहे. प्रत्येक अव्यवस्थेसाठी राज्यांकडून, केंद्र सरकारला जबाबदार धरण्यात येण्याची शक्यता अधिक आहे.
६. भाजपाच्या २०२४च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीवरही परिणाम
भाजपाच्या २०२४ च्या लोकसभा निवनडणुकांच्या रणनीतीवरही या निकालांचा परिणामं होणार आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर, उ. प्रदेश, बिहारसारख्या मोठ्या राज्यात येत्या निवडणुकांत भाजपाला एन्ट्री इक्नंबसीला सामोरे जावे लागणार आहे. अशा स्थितीत पश्चिम बंगाल निवडणुकांत यश मिळाले असते, तर प. बंगालच्या ४२ जागांवर प्रभाव टाकता येणार होता. मात्र आता या पराभवानंतर लोकोसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेस अधिक जोर लावेल.
७. कृषी कायदे मागे घेण्यासाठी भाजपावर दबाव वाढणार
या निकालानंतर भाजपाला आत्मचिंतन करावे लागणार आहे. शेतकरी आंदोलनामुळे सरकारच्या प्रतिमेवर झालेल्या परिणामांची दखलही भाजपाला घ्यावी लागेल. शेतकरी आंदोलनातील काही नेत्यांनीही बंगालच्या निवडणपकीत प्रचार केला होता. आता आगामी काळात हे आंदोलनही नव्या जोमाने उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपासमोरच्या अडचणी वाढणार आहेत.