सातारा : जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूचे (Omicron Virus) संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आहे. शंभर टक्के मास्कचा वापर आणि लसींचे दोन डोस (Vaccination) पूर्ण करणाऱ्यांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. मास्क नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी देत त्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओमिक्रॉन विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेची जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत जे प्रतिबंधात्मक उपाय निर्देशित झाले त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर शिंह म्हणाले की, ओमिक्रॉन हा विषाणू 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत बोट स्वाना येथे आढळून आला. कोरोनाच्या डेल्टा विषाणूला मात देणारा हा विषाणू तीस पट अधिक संक्रमणशील असल्याने परदेशात संसर्गाची भीती वाढली आहे. केंद्र शासन व आयसीएमआरच्या निर्देशाप्रमाणे परदेशातून पुणे व मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांचे विमानतळावर संस्थात्मक विलगीकरण करून त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. याशिवाय टेस्ट निगेटिव्ह आली तरी सात दिवस त्यांना विशेष निरीक्षणात ठेवले जाणार आहे.
नागरिक ज्या जिल्ह्यात जाणार असून, त्यांनाही त्याची माहिती दिली जाणार आहे. संबंधित क्षेत्रातील आरोग्य यंत्रणांनी या व्यक्तींवर आठवडाभर विलगीकरणात ठेऊन त्यांचे स्क्रिनिंग करावयाचे आहे. शेखर सिंग पुढे म्हणाले, डेल्टानंतर ओमिक्रॉन हा विषाणू संक्रमित झाला आहे. आपल्या देशात अजून एकही ओमिक्रॉनचा रुग्ण सकाळपर्यंत नाही. डब्ल्यूएचओच्या (WHO) संदर्भानुसार, डेल्टा ८० दिवसांनी आला. पण ओमिक्रॉनचे केसेस येण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात. या व्हायरसला रोखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. आरटीपीसीआरची चाचणी वाढवावी लागणार आहे. आजमितीस जिल्ह्यात ५ हजार चाचण्या होऊ शकतात.